बांबूची सायकल

बांबू ही एक अत्यंत मौल्यवान आणि बहुउपयोगी वनस्पती. बांबूपासून शेकडो प्रकारच्या वस्तू बनतात. बांबूला औद्योगिकदृष्ट्या प्रचंड मूल्य आहे. कागद, फर्निचर, चमचे, टूथब्रश, स्पीकर, बासरीसारखी वाद्ये, अशा नाना तऱ्हेच्या वस्तू बांबूपासून बनतात. आधुनिक काळात जसजसं संशोधन होतंय, तसतसं बांबूची कॉम्प्युटर फ्रेम, बांबूचा कीबोर्ड, बांबूचे सॅनिटरी नॅपकिन अशा वस्तूही बनू लागल्या आहेत. असंच एक अभिनव संशोधन म्हणजे बांबूची सायकल!

 

बांबूची सायकल सर्वप्रथम इंग्लंडमध्ये १८९४ साली 'बांबू सायकल कंपनी' कडून बनवली गेली. या कंपनीने या सायकलचं पेटंटही घेतलं होत. १८९६ साली ऑगस्ट ओबर्ग आणि अँड्र्यू गस्टाफसन या अमेरिकी उद्योजकांनी तशीच बांबूची सायकल बनवली आणि त्याचं पेटंट घेतलं. मात्र लवकरच अल्युमिनियम आणि स्टीलचा शोध लागल्याने आणि हे धातू स्वस्तात उपलब्ध होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर बांबूच्या सायकलींचं उत्पादन होऊ शकलं नाही. मात्र अलीकडे पर्यावरण जागृतीमुळे काही कंपन्यांनी  पुन्हा बांबूच्या सायकलींचं उत्पादन सुरु केलं आहे आणि लोक त्या खरेदी करू लागले आहेत. बांबूच्या सायकलीत मधली फ्रेम ही धातूच्या ऐवजी बांबूची बनवली जाते. २००७ साली कोलंबिया विद्यापीठातल्या अभियंत्यांनी 'बांबू बाईक प्रोजेक्ट' सुरु केला आणि बांबूच्या सायकलींचं उत्पादन सुरु केलं. घाना या देशात बर्निस देपाह याने संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सहकार्याने 'घाना बांबू बाईक इनिशिएटिव्ह' या नावाने बांबू सायकल उत्पादनाचा उपक्रम सुरु केला. हवामानबदल आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला गेला. यामध्ये उत्पादन केलेल्या बांबूच्या सायकली आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेत विकल्या जातात.

भारतात गोदरेज कंपनीने सर्वप्रथम 'बांबूसा' या नावाने बांबूच्या सायकली बनवायला सुरुवात केली. आज मोठ्या प्रमाणावर सायकलींचं उत्पादन होतं. पुण्याच्या शशिशेखर पाठक या अगोदर वैमानिक असलेल्या उद्योजकाने 'बांबूची सायकल' या नावानेच एक कंपनी सुरु करून बांबूच्या सायकलींचे उत्पादन सुरु केले आहे. भारतात बांबू सर्वत्र विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे या उद्योगाला भरपूर वाव आहे. अलीकडे पर्यावरण जागृतीमुळे लोकांचा पुन्हा सायकली वापरण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बांबूची सायकल हे उत्पादन भारतात ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीच्या भरपूर संधी घेऊन येईल. 

- संपादकीय 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.