डिस्टन्स लर्निंग सेंटर: एक व्यवसाय

"An investment in knowledge always pays best interest... ज्ञानातील गुंतवणूक नेहमीच सर्वोत्तम व्याज देते." - बेंजमीन फ्रँकलीन

बेंजमीन फ्रँकलीनला आधुनिक अमेरिकेचा जनक संबोधले जाते. आज अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत व राजकीय तंत्रज्ञान व विकासाच्या दृष्टीने सर्वात शक्तीशाली देश आहे. यामागे बेंजमीन फ्रँकलीनच्या शिक्षणविषयक तत्वज्ञानाचा सिंहाचा वाटा आहे. त्याने open schooling म्हणजेच खुल्या शिक्षण पध्दतीची संकल्पना सर्वप्रथम मांडली. बेंजमीन फ्रँकलीनने पारंपरिक शिक्षण पद्धतीचे कधीच समर्थन केले नाही. त्याने आधुनिक भाषा, कृषि अकाऊंटींग व इतर व्यवहारीक विषयांवर भर दिला. या तत्वज्ञानामुळेच  अमेरिका आज सर्वात बलशाली देश आहे. आपल्याकडे अजूनही पारंपरिक शिक्षण घेतले जाते. घरातील जबाबदार्‍या व नोकरीमुळे बर्‍याच जणांना पूर्ण वेळ शिक्षण घेता येत नाही. तसेच इंजिनीअरींग, एमबीए, बीएड इत्यादी लाखो रुपये खर्चून सुद्धा शेवटी बेकार फिरण्यापेक्षा कमी पैशात पार्टटाईम, परंतु उपयोगाचे व व्यवहारीक शिक्षण आज काळाची गरज झाली आहे. याला सध्या एक महत्वपूर्ण पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे डिस्टन्स लर्निंग. यामध्ये कोणत्याही प्रकारचे शिक्षण, कोर्स, कमी पैशात व पार्ट टाईममध्ये पूर्ण करता येतात. दुसरी बाजू म्हणजे स्वत:चे डिस्टन्स लर्निंग सेंटर ही एक चांगली व्यवसाय संकल्पना आहे.

आजकाल बर्‍याच विद्यापीठांनी आपल्या शिक्षण पध्दतीत डिस्टन्स लर्निंगचा समावेश केला आहे. विश्लेषकांच्या मते डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. या क्षेत्रात स्वत:चे डिस्टन्स लर्निंग सेंटर सुरू करणे हा चांगला निर्णय ठरू शकतो. तसेच विद्यार्थ्याच्या जीवनात महत्वपूर्ण विकास व प्रगती घडवण्याचे सत्कार्य देखील तुमच्या हातून घडेल. शिक्षण केंद्र सुरू करण्यापूर्वी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. यासाठी या क्षेत्रातील स्पर्धा व काही आर्थिक बाबींचा अंदाज घेणे आवश्यक आहे.

या व्यवसायासाठी अंदाजे ३०० ते ५०० चौ. फुटाचे कार्यालय असणे आवश्यक आहे. तसेच त्यामध्ये सुयोग्य फर्निचर, शैक्षणिक साहित्य, वाचनालय, कॉम्प्युटर्स, ५ ते ६ विद्यापीठासोबत संलग्नता असणे आवश्यक आहे. या व्यवसायासाठी किमान १५ ते २० लाख रुपये भांडवल आवश्यक आहे. बँका, पतसंस्था, खाजगी गुंतवणूकदार यांच्यामार्फत वित्तपुरवठा होऊ शकतो. आपले लर्निंग सेंटर हे सुयोग्य जागी असावे. तसेच शिक्षक/समुपदेशक म्हणून शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी. त्यामुळे तुमच्या सेंटरला विश्वासार्हता प्राप्त होईल. या व्यवसायात मार्केटींग  हा महत्वाचा घटक आहे. त्यासाठी वेबसाईट, सोशलमीडिया, स्थानिक जाहिरातदार, वृत्तपत्रे या माध्यमांचा वापर होऊ शकतो. विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या ऑफर्स व चांगले प्रमोशन केल्यास व उत्तम मार्केटींग केल्यास वर्षाला अंदाजे ३०० विद्यार्थी मिळू शकतात. एकूण २५ ते ३० लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. यातून १० लाखांपर्यंत प्रतिवर्षी नफा मिळू शकतो. 

– प्रा. प्रकाश भोसले

ebrandingindia2017@gmail.com

व्हॉटसअॅप नंबर - ९८६७८०६३९९

(लेखक ‘ई-ब्रॅण्डिंग’ या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी तब्बल एक तप विविध बी2बी पोर्टल्स व ‘गुगल’ सर्च इंजिनसोबत काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्रभरात उद्योजकता विकासाचे काम करत आहेत. )

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.