मुंबईः सुमारे 19.4 अब्ज डॉलर्स उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहातील ‘महिंद्रा अँड महिंद्रा लि.’ या कंपनीच्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’तर्फे (एफईएस) आपल्या ट्रॅक्टर विक्रीची एप्रिल 2021 मधील संख्या आज जाहीर करण्यात आली. एप्रिल 2021 मध्ये या ट्रॅक्टर्सची देशांतर्गत विक्री 26,130 इतकी झाली आहे. एप्रिल 2020 मध्ये ही विक्री 4,716 इतकी होती.
एप्रिल 2021 मध्ये एकूण ट्रॅक्टर विक्री (देशांतर्गत + निर्यात) 27,523 युनिट इतकी झाली आहे. या तुलनेत, गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये ती 4,772 युनिट झाली होती. या महिन्यात 1,393 ट्रॅक्टर्सची एकूण निर्यात झाली.
या कामगिरीबद्दल मत व्यक्त करताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा लि.’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’चे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, “आम्ही एप्रिल 2021 मध्ये देशांतर्गत बाजारात 26,130 ट्रॅक्टर विकले असून गतवर्षाच्या तुलनेत त्यात 454 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये देशव्यापी टाळेबंदीमुळे व्यवसायावर परिणाम झाला होता व तेव्हाची आकडेवारी खूपच कमी होती. त्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमधील आकडेवारी मोठी आहे.
काही ठिकाणी स्थानिक पातळीवर असलेल्या टाळेबंदीमुळे पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले आहेत, तसेच काही राज्यांमधील वितरकांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे एकूण मागणीवर परिणाम होत आहे; मात्र कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व गोष्टी अनुकूल आहेत. रब्बी पिकाची कापणी जोमात सुरू असून मान्सूनचा पाऊसही सामान्य प्रमाणात होईल, असे अंदाज व्यक्त झाले आहेत. आगामी आठवड्यांत शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांसाठी आपली जमीन कसायला सुरवात केल्यावर ट्रॅक्टरची मागणी पुन्हा वाढेल, अशी आम्हाला आशा आहे. राज्या-राज्यांमधील कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि आमचे कर्मचारी व भागीदार यांच्या सुरक्षिततेबद्दल आम्ही जागरूक आहोत.
निर्यातीच्या बाजारपेठेत आम्ही 1393 ट्रॅक्टर विकले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 2,388 टक्क्यांची आहे. यंदा आमच्याकडे निर्यातीसाठी मोठ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत.”