२०२५ पर्यंत 'टाटा स्टील' कंपनी महिला कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करून ती १० टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याची बातमी मंगळवारी कंपनीच्या सूत्रांनी दिली. टाटा स्टील कंपनीत सध्या ३५ हजार कर्मचारी कार्यरत असून त्यांपैकी १७५० महिला कर्मचारी आहेत. म्हणजेच महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण हे ५ टक्के आहेत. हे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी आवश्यक ते तांत्रिक आणि उत्पादनाचे प्रशिक्षण महिला कर्मचाऱ्यांना देण्याचीही कंपनीची योजना आहे.
टाटा स्टील कंपनीमध्ये आत्तापर्यंत प्रामुख्याने सकाळी ९.०० ते सायं. ५.०० या वेळेतच महिलांना काम दिले जाते आहे. मात्र यापुढे सकाळी ६.०० ते रात्री १०.०० पर्यंत सर्व शिफ्ट्समध्ये महिला कर्मचाऱ्यांची समान संख्या कार्यालयांमध्ये राखली जाईल, अशी पुनर्रचना कंपनीकडून करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांना आवश्यक ते तांत्रिक प्रशिक्षण, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना, इ. बाबी अंतर्भूत असणार आहेत.
'टाटा स्टील' च्या झारखंड येथील कारखान्यात सध्या एकूण २० हजार कर्मचारी असून त्यांपैकी १३०० महिला आहेत. या महिलांपैकी ५०० महिला या अधिकारी आहेत. टाटा स्टील कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या 'डायव्हर्स वर्कफोर्स' या अहवालात ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नवीन आर्थिक वर्षात दि. १ एप्रिल २०१९ रोजी टाटा स्टील कंपनीने जमशेदपूर येथील कारखान्यात दोन शिफ्ट्समध्ये काम करणाऱ्या ५२ महिलांना नियुक्त्त केले. टाटा स्टील कंपनीच्या मानव संसाधन विभागाकडून कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी अधिकाधिक आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये पाच दिवसांचा आठवडा, मातृत्व रजा, पितृत्व रजा, मासिक पाळी रजा, इ. सुविधांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे.
- udyogvivek@gmail.com