‘इंडस’चे कुल‘दीपक’

उद्योग जगतात यशाचा मूलमंत्र म्हणजे अथक परिश्रम, पैशाचे काटेकोर व्यवस्थापन आणि त्याला उत्तम व्यावसायिक मूल्यांची जोड. याच त्रिसूत्रीच्या बळावर एका मराठी माणसाने लॉजिस्टिक्स आणि शिपिंगच्या क्षेत्रात उडी घेतली. अनंत अडचणी, आव्हानांचे सात समुद्र पार करीत दीपक चौधरींनी ‘इंडस’चे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. परंतु, ‘मी आणि माझा उद्योग’ असा केवळ नफाकेंद्रित विचार न करता त्यांनी ‘इंडस’ आणि ‘लायन्स क्लब’च्या माध्यमातून सामाजिक हितालाही अग्रस्थानी ठेवले. तेव्हा, एक यशस्वी आणि समाजभान जपणारे उद्योजक दीपक चौधरी यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...

दीपक चौधरी हे सफाळ्याजवळच्या मूळच्या मथाणे गावचे. पण, त्यांचे वडील व्यवसायानिमित्त वाड्याला स्थायिक झाले. म्हणून दीपक यांचं पाचवीपर्यंतचं शिक्षणही वाड्यातच झालं. घरचं वातावरण शिक्षणासाठी अनुकूल असल्यामुळे आणि वडिलांना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यावरील विश्वासामुळे दीपक यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये पार पडले. पुढे ते मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये दाखल झाले. दीपक यांनी रसायनशास्त्रात बीएससीची पदवी संपादित केली आणि त्यानंतर आयआयएमएसमधून त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

दीपक यांच्या घरचे वातावरणही तसे उद्योगाला अतिशय पूरक. आजही त्यांची इतर भावंडं उद्योग-व्यवसायातच अग्रेसर आहेत. म्हणजे, व्यावसायिक वृत्ती ही तशी चौधरींच्या घराण्यात उपजतच! दीपक यांचे वडील ज्युनिअर मामलेदाराची नोकरी सोडून वाड्यासारख्या ठिकाणी व्यवसायासाठी स्थायिक झाले. तिथे त्यांनी पाणवेलींच्या कारवींचा पुरवठा (बांबू) आणि मंडप उभारणीचा व्यवसाय सुरू केला. पुढे याच छोट्या व्यवसायाचे रूपांतर सॉ मिलमध्येही झाले. उत्तरोत्तर दीपक चौधरी यांच्या वडिलांची उद्यम प्रगती होत होती. त्याच जोरावर त्यांनी मिठागरं विकत घेतली आणि इतर छोटे-मोठे व्यवसायही यशस्वीरित्या सांभाळले. व्यवसायाचे हे बाळकडू दीपक यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. बीएस्सी पूर्ण केल्यानंतर त्यांच्यासमोर दोन पर्याय होते; एक तर वडिलांचा परंपरागत व्यवसाय पुढे न्यायचा किंवा स्वत:चा नवीन व्यवसाय उभा करायचा. दीपक यांनी दुसर्‍या आव्हानात्मक पर्यायाची निवड केली. रसायनशास्त्रात बीएस्सी केल्यामुळे केमिकल फॅक्टरी उभारावी असा त्यांचा विचार होता. पण, त्यासाठी भरपूर भांडवलाची आवश्यकता होतीच. तेव्हा नवीन कंपनीच्या बीजभांडवलासाठी दीपक यांनी त्यांच्या वडिलांकडे विचारणा केली खरी, पण त्यांच्या वडिलांनी, ‘‘माझ्याकडून पैशाची अजिबात अपेक्षा करू नकोस. तुला जे करायचंय ते तू स्वत:च्या जोरावर कर,’’ असा दिलेला सल्ला दीपक यांना दुखावून गेला. पण, वडिलांचे ते खडे बोल स्वत:च्या पायावर उभं राहण्याची जिद्द दीपक यांच्या मनात निर्माण करून गेली. पण, भांडवल उभारणी अभावी त्यावेळी त्यांना व्यवसायाचा श्रीगणेशा करता आला नाही. इंडियन मर्चंट्‌स चेंबरच्या एका बैठकीत जो पोमायसन नावाच्या परदेशी गृहस्थांशी चौधरींची भेट झाली. व्यवस्थापन क्षेत्रातील चौधरींची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांनी परदेशी कंपनीचे भारतात स्वतंत्र प्रॉफीट सेंटर म्हणून कंपनी चालविण्याचा प्रस्ताव दिला. चौधरींनी तो स्वीकारला आणि नरिमन पॉईंटला ऑफिस घेऊन कामही सुरू केले. त्यानंतर १९९१-९२ साली एबीसी इंडिया प्रा. लि. ही कंपनीही सुरू झाली.

नोकरीतील लॉजिस्टिकस आणि शिपिंग क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर चौधरींनी मग १९९४ साली ‘इंडस’ कंपनीची स्थापना केली. पण, भागीदारीत सुरू केलेल्या कंपनीत मतभेद झाल्याने चौधरी त्यातून बाहेर पडले आणि पुन्हा १९९६ साली नव्या जोमाने त्यांनी ‘इंडस’चा उद्योग पुनर्प्रस्थापित केला. २५० स्के. फूट इतक्या छोट्याशा जागेत फोर्टला सुरू केलेल्या ‘इंडस’चा वटवृक्ष मात्र आज महाराष्ट्राबाहेरही बहरला आहे. आजघडीला नागपूर, औरंगाबाद, बडोदा, अहमदाबाद यांसारख्या शहरांतही ‘इंडस’ने आपल्या कामाचा ठसा उमटविला असून एकूण ९० कर्मचारी ‘इंडस’मध्ये कार्यरत आहेत. पण म्हणतात ना, कुठलाही व्यवसाय अगदी सहजासहजी यशोशिखराला पोहोचत नाही. अनंत अडचणी, खाचखळग्यांतून तावून सुलाखून, अग्निदिव्यातून उद्योग आणि उद्योजकाला उभं राहावं लागतं. दीपक चौधरीही त्याला अपवाद नाहीतच. शिपिंग आणि लॉजिस्टिकच्या या क्षेत्रात मराठी व्यावसायिक तसे तुलनेने कमीच. त्यामुळे त्या व्यवसायातील बहुसंख्येतील जाती-समुदायांतील घटक असल्याचा फायदा चौधरींना मिळाला नाही. त्यातच व्यावसायिक मार्गदर्शन करणारा कोणी ‘गॉडफादर’ही चौधरींना लाभला नाही. तरीही सकारात्मक विचारांच्या बळावर चौधरींच्या ‘इंडस’ने अगदी अल्पावधीतच प्रगतीचे टप्पे पार केले. असे हे व्यावसायिक पातळीवर सक्रिय असलेले उद्योजक दीपक चौधरी सामाजिक कार्यातही तितकेच आघाडीवर आहेत. ते सध्या लायन्स क्लबचे व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असून तलासरी ते वांद्रे या क्षेत्रातील एकूण १२० लायन्स क्लब त्यांच्या अखत्यारित येतात. लायन्स क्लबतर्फे शाळांमध्ये शालोपयोगी साहित्य देणे, छोटी धरणे, समाजकेंद्र, रुग्णालयांची उभारणी करणे, स्वस्तात डायलेसिस सुविधा, मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि गरजूंना इतर वैद्यकीय सुविधाही पुरविल्या जातात. मुंबईसारख्या महानगरापासून १०० कि.मी. अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील कित्येक गावांत आजही विद्यार्थ्यांना दोन-तीन कि.मी. पायपीट करत शाळा गाठावी लागते. आरोग्याच्या पुरेशा सुविधाही उपलब्ध नाहीत. तेव्हा, अशा दुर्लक्षित आणि विकासापासून वंचित भागांमध्ये सामुदायिक केंद्र, आरोग्य केंद्र उभारण्याचाही चौधरी यांचा मानस आहे. तसेच पालघर जिल्ह्याचा विचार करता, तिथेही उद्योजकांना व्यवसाय करण्याची स्फूर्ती मिळावी, उद्योजक घडावेत, त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभावे म्हणून ‘नॉर्थ कोकण चेंबर’ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे चौधरी संस्थापक-उपाध्यक्ष असून डहाणू, विरारमधील उद्योजकांच्या व्यापक हितासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. घराबाहेर उद्योजक घडविणारे, त्यांना मार्गदर्शन करणार्‍या चौधरींच्या मुलीनेही ‘तिसोरा डिझाईन्स’ या ब्रॅण्डसह फॅशन आणि ट्रॅव्हल ऍक्सेसरीजच्या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या मुलीला नवीन व्यवसाय करण्यासाठी चौधरींनीही संपूर्ण आर्थिक मदत न करता, केवळ दादरमध्ये व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि आज त्यांच्या मुलीने संपूर्ण आत्मविश्वासाने स्वबळावर व्यवसायात भरारी घेतली आहे. त्यामुळे चौधरी सांगतात की, ‘‘व्यवसायासाठी अगदी सहजासहजी पैसा उपलब्ध झाला, तर त्या पैशाची किंमत कळत नाही. तेव्हा, स्वत:च्या हिमतीवर भांडवलाची जुळवाजुळव करा. त्याचबरोबर, व्यवसायातील दैनंदिन समस्यांवर मात करण्यासाठी ‘प्रॅक्टिकल सोल्युशन्स’चा विचार करणेही उद्योजकांसाठी गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टींचा विचार केल्यास यश हे निश्चितच उद्योजकांच्या पदरात पडेल.’’

उत्तम व्यावसायिक मूल्यांचा विचार करताना उद्योजकांनी सामाजिक जबाबदारीचे भानही विसरून चालणार नाही. म्हणूनच, ‘इंडस’तर्फे ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर)च्या अंतर्गत मुंबईतील लायन्स एअरपोर्ट संस्थेसोबत दिव्यांग मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मिनी ऑलिम्पिक स्पर्धा व इतर अनेक उपक्रमांचेही आयोजन केले जाते.

समाजाचेही आपण काही देणे लागतो, या उक्तीनुसार दीपक चौधरी यांनी ‘श्वास’ या चित्रपटाची मन हेलावून टाकणारी कथा ऐकून निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावली. ‘श्र्वास’ला ऑस्करचे नामांकन जाहीर होणार्‍या पहिल्या मराठी चित्रपटाचा मान मिळाला. चौधरींनी अमेरिकेत, हॉलिवूड चित्रपटसृष्टीतही ‘श्वास’चा प्रचार-प्रसार केला. समीक्षकांसह प्रेक्षकांच्या मनात ‘श्वास’ कायमस्वरूपी घर करून गेला. ‘श्वास फाऊंडेशन’ने राज्य सरकारला दिलेल्या ४५ लाख रुपयांपैकी आजही सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाला चार लाखांचा घवघवीत पुरस्कार दिला जातो. ‘श्वास’नंतरही सामाजिक विषयावर एचआयव्हीबाधित मुलांच्या समस्यांचे चित्रण करणारा ‘आम्ही चमकते तारे’ या चित्रपटाची चौधरी यांनी निर्मिती केली. हा चित्रपट व्यावसायिक पातळीवर फार चालला नसला तरीही वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून त्याची विशेष दखल घेतली गेली.

उद्योजकता आणि समाजकार्याबरोबरच चौधरी यांना व्हॉलीबॉलचीही आवड आहे. ते रोज शिवाजी पार्कच्या व्यायामशाळेत आवर्जून हजेरी लावतात. त्याचबरोबर चौधरींना वाचनाची, चित्रकलेचीही तितकीच आवड. एवढेच काय, तर नुकतीच ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट ऍण्ड लॉजिस्टिक्स’ या विषयात चौधरी यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडीही मिळवली आहे. त्यांना उद्योगरत्न पुरस्कार, उन्नयन मासिकातर्फे दिल्या जाणार्‍या पुरस्काराने आणि अशा अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. जेआरडी टाटा आणि नारायण मूर्तींना ते उद्योग जगतातील आदर्श मानतात. त्यांच्या व्यावसायिक मूल्यांबद्दल अतीव आदरभाव असल्याचे चौधरी विशेषत्वाने सांगतात. जाता जाता उद्योजकांना कानमंत्र म्हणून चौधरी सांगतात की, ‘‘उद्योजक यशस्वी झाले की, त्यांच्याविषयी सगळेच बोलतात पण, जे अपयशी झाले, त्यांचा कुणी अभ्यासही करत नाही. पण खर तर, त्यांच्या अपयशाची कारणमीमांसा झाली पाहिजे आणि इतरांनी त्यातून शिकायला हवे.’’ 

असे हे दीपक चौधरी नावाचे रसायन स्वत: एक यशस्वी उद्योजक म्हणून घडलेच, पण समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या विकासासाठी, होतकरू उद्योजकांना मार्गदर्शक म्हणून त्यांनी केलेले कार्य स्पृहणीय आहे.

                                                                                                                                                - विजय कुलकर्णी

                                                                                                                                                udyogvivek@gmail.com

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.