लिंक्डइन

‘लिंक्डइन’ किंवा ‘लिंक्डइन डॉट कॉम’ ही एक प्रमुख व्यावसायिक वेबसाईट आहे. यामार्फत विविध व्यक्ती किंवा कंपन्या एकमेकांशी जोडलेल्या असतात. लिंक्डइनला एक प्रमुख समाजमाध्यमाच्या यादीतही गणले जाते. आज जगभरात लिंक्डइनचे ९० लाखांपेक्षा जास्त सदस्य आहेत. आणि दोनशेहून अधिक देशांमधून या ‘लिंक्डइन’चे वापरकर्ते आपल्याला दिसून येतात. जगातल्या वेगवेगळ्या प्रमुख कंपन्यांचे अधिकारी या ‘लिंक्डइन’च्या संपर्क कक्षेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. तेव्हा, आज आपण या ‘लिंक्डइन’चे कार्य, त्यांचा एकूणच व्यवसाय, त्याचे फायदे, नोकरी मिळवण्यासाठी त्याचा उपयोग, अशा विविध पैलूंनी या सोशल नेटवर्कची माहिती करुन घेऊया.

समाजमाध्यमे समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींना, वेगवेगळ्या घटकांना जोडण्याचे, एकत्रित आणण्याचे तसेच अभिव्यक्तीचे एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते. या समाजमाध्यमांतून खूप मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजीही केली जाते, हे आपण यापूर्वीही या स्तंभामध्ये पाहिले. परंतु, जेव्हा आपण ब्रॅण्डिंगचा विचार करतो, त्यावेळी ब्रॅण्डिंगमधील सर्वात महत्त्वाचे नाव येते ते ‘लिंक्डइन’चे. लिंक्डइनची सुरुवात ही २८ डिसेंबर २००२ साली झाली. प्रारंभी या कंपनीचे काम केवळ ब्रॅण्डिंग करण्याचे होते आणि त्यावेळी ही कंपनी प्रसिद्धसुद्दा नव्हती. त्यावेळी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, गुगल प्लस यांसारखे इतर समाजमाध्यमेही उपलब्ध नव्हती. त्या काळात लिंक्डइनचे काम सुरु झाले. मात्र, इतर सोशल नेटवर्किंग साईट्सप्रमाणे लिंक्डइनवर कोणत्याही प्रकारचे थिल्लरबाजीचे किंवा टाईमपास करण्याचे काम होत नाही, तर गंभीर स्वरुपाचे काम लिंक्डइनवरुन केले जाते. लिंक्डइनवरती मोठ्या प्रमाणावर व्यवसायाशी निगडीत गोष्टी जोडलेल्या दिसतात. लोकसुद्धा आपल्या स्वतःच्या नोकरीच्या शोधासाठी, नवीन व्यवसायाच्या शोधासाठी आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा दुसऱ्याचा व्यवसाय जाणून घेण्यासाठी लिंक्डइनचा वापर करतात. तुमचा एखादा छोटासा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाला तुम्हाला प्रसिद्धी द्यायची आहे, तर मग तुम्ही लिंक्डइनचा उपयोग करू शकता आणि तुमच्या व्यवसायासाठी प्रसिद्धी मिळवू शकता. हे कसे करता येते, हे आपण जाणून घेऊया.

लिंक्डइनचा वापर

लिंक्डइनचा प्रत्यक्ष उपयोग करण्यासाठी आपल्याला लिंक्डइनवर स्वतःचे खाते उघडावे लागते. त्यासाठी आपल्याला एका विशिष्ट अशा ई-मेल आणि मोबाईल नंबरची आवश्यकता असते. त्याआधारे लिंक्डइनवरती आपण आपले खाते सुरू करू शकतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या स्वत:च्या खात्यावरती तुमच्या व्यवसायाशी निगडीत किंवा जी काही नोकरी तुम्ही करत आहात त्याच्याशी संबंधित माहिती प्रसिद्ध करू शकता आणि लोकांना तुम्ही त्यामार्फत जोडू शकता. लिंक्डइनमध्ये सर्व प्रकारच्या सेवा मोफत नसतात. अर्थात, त्यामध्ये केवळ खाते उघडायचे असेल, तर ती मोफत सेवा असते आणि त्यासाठी आपल्याला कोणतीच किंमत मोजावी लागत नाही. मात्र, जिथे तुम्हाला महिन्यांच्या हिशोबाने आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी करायची असेल, तर त्याचे वार्षिक शुल्क मात्र भरावे लागते आणि ते ही अमेरिकन डॉलरमध्ये. आताच्या तारखेला २९ डॉलर प्रती वर्ष इतके लिंक्डइनचे वार्षिक शुल्क आहे. त्याचबरोबर लिंक्डइनची वेगवेगळी पॅकेजेसही उपलब्ध आहेत. तुम्ही लिंक्डइनमार्फत नोकरी शोधू शकता किंवा तुमची प्रोफाईल पाहून तुम्हाला नवीन नोकरीच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही तुमचे प्रोफाईल नेहमी अपडेट करू शकता किंवा स्वतःची प्रोफाईल अथवा बायोडेटा अपडेट करता येतो. त्यामार्फत तुम्ही तुमच्या उत्पन्नामध्ये पण भर घालू शकता. गेल्या काही वर्षापासून भारतामध्येसुद्धा लिंक्डइन लोकप्रिय झाल्याचे दिसते. अर्थात, या बाबतीत आणखी जास्त जनजागृतीची गरज आहे. कारण, बऱ्याचशा लोकांना अजूनही माहिती लिंक्डइन म्हणजे नेमके काय आहे आणि त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो, याची बऱ्याच जणांना माहिती नसते. कारण, इतर समाजमाध्यमांना जितके लवकर आत्मसात केले गेले, तितक्या लवकर नेटकऱ्यानी लिंक्डइनला आपलेसे केलेले नाही.

लिंक्डइनचा प्रभावी वापर कसा करावा?

लिंक्डइनमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध असतात. त्यामध्ये एक ‘सेल्स नेव्हीगेटर’ हा पर्याय असतो आणि या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही ‘लीड जनरेशन’चे काम करू शकता. त्याच्या आधारे ऑनलाईन कार्य तुम्हाला सुरू करता येते. जे वेगवेगळे विकल्प आहेत, त्यातीलच एक ‘सेल्स नेव्हीगेटर’ हा विकल्प आहे. यामध्ये तुम्हाला ६९ डॉलरचे पॅकेज एका महिन्यासाठी सुरुवातीला विकत घ्यावे लागते. त्यानंतर तुम्ही तुमच्या उत्पादनाची, सेवेची किंवा एखाद्या ब्रॅण्डची विक्री करू शकता किंवा त्याची प्रसिद्धी करू शकता. एकदा तुम्ही जर ‘सेल्स नेव्हीगेटर’ चालू केले तर त्यानंतर तुम्ही त्या विशिष्ट उत्पादनाला किंवा ब्रॅण्डला संपूर्ण जगामध्ये ऑनलाईन विकू शकता किंवा तुम्हाला त्याची ऑनलाईन ऑर्डर येऊ शकते. सुरुवातीला काही माध्यमांसाठी लिंक्डइनमध्ये एका महिन्याची मोफत सेवासुद्धा दिली जाते आणि नंतर त्याची नोंदणी करावी लागते. त्यानंतर जर तुम्हाला फ्री-अ‍ॅक्टीव्हेशन करायचे आहे किंवा फ्री सर्व्हिस सुरू करण्यासाठीसुद्धा क्रेडीट कार्डची संपूर्ण माहिती मागवली जाते. जर तुम्हाला लिंक्डइनच्या सेवेचा पुढे उपयोग करून घ्यायचा असेल, तर मात्र तुम्हाला त्यांच्या पेड सर्व्हिसचे शुल्क भरावे लागते. तीस दिवसानंतर त्याप्रमाणे तुमच्या क्रेडीट कार्डवरून तसे पैसे कापले जातात किंवा तुम्हाला जर ती सेवा बंद करायची असेल, तर त्याचा रिफंडसुद्धा मिळू शकतो.  लिंक्डइनचा उपयोग आधी संगणकामार्फतच केला जायचा. मात्र, आता टॅब्लेट किंवा मोबाईलच्या माध्यमातूनसुद्धा लिंक्डइनचा उपयोग केला जातो. त्यासाठी आपण लिंक्डइनवरती स्वतःचे खाते निर्माण करत असताना लिंक्डइनचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागते. त्यामार्फत तुम्ही लिंक्डइनचा उपयोग करू शकता. त्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला तिथे भरावी लागते. त्यासाठी त्यांचे जे अधिकृत पेज आहे, त्याला तुम्हाला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला नवीन खाते उघडावे लागते. त्यासाठी आपली सर्व प्राथमिक माहिती द्यावी लागते. तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल किंवा नोकरीबद्दलचे तपशील नमूद करावे लागतात. तुम्ही स्वतःबद्दल काही कमेंट्ससुद्धा तिथे टाकू शकता. त्याखेरीज जर काही समस्या तुम्हाला असतील, तर किंवा त्या संदर्भातील प्रश्न असतील, तर लिंक्डइनला थेट ईमेलच्या माध्यमातून किंवा मेसेजद्वारे विचारु शकता.

लिंक्डइनचा वाढता प्रभाव आणि त्यामागील कारणे

एकदा लिंक्डइनचा सदस्य झाल्यानंतर ती व्यक्ती त्या लिंक्डइनसाठीचे आमंत्रण हे इतर सदस्यांना पाठवू शकते आणि जो लिंक्डइनचा सदस्य नाही, त्यालाही आपण त्यामध्ये सहभागी करु शकतो. एकदा जर तुमच्यामार्फत लोकांनी लिंक्डइन सुरू केले, तर तुम्हाला त्या संदर्भात त्याचा फायदा होतो. तुमची प्रोफाईल जास्त लोकांकडून वापरली जाते. हा एक प्रकारे ऑनलाईन बायोडेटा असतो, जो सातत्याने आपण बदलू शकतो. त्या ऑनलाईन बायोडाटाचा वापर आपण समाजमाध्यमांवरती असलेले किंवा ज्या ज्या लोकांना ते उपलब्ध आहे ते सर्वच लोक करु शकतात. त्याच्यामुळे ते बघून लोकं तुम्हाला नोकरीसाठी संधी देऊ शकतात. वेगवेगळ्या नोकऱ्या हे लिंक्डइनमार्फत मिळतात, असा एकंदर अनुभव आहे आणि हेच लिंक्डइनच्या खूप मोठ्या लोकप्रियतेचे कारण आहे. एखाद्या कंपनीला विशिष्ट पदासाठी ज्या पात्रतेची आवश्यकता आहे, ती पात्रतादेखील लिंक्डइनवरती सर्च करून शोधता येते आणि त्या अनुषंगाने त्या त्या नोकरदारांना किंवा त्या व्यावसायिकाला संपर्क केला जातो. लोकांना त्या माध्यमातून नोकऱ्याही मिळतात. बऱ्याच कंपन्यांचा मनुष्यबळ विभागदेखील लिंक्डइनवर सक्रिय असतो आणि तोसुद्धा इतर कंपन्यांची माहिती घेत सर्वेक्षण करून त्याआधारे आपल्या कंपनीमध्ये योग्य तो बदल करु शकतो.

लिंक्डइन आणि व्यवसाय

व्यवसायासाठी व्यावसायिक भागीदाराची निवडसुद्धा आपण लिंक्डइनमार्फत करू शकतो. या खेरीज काही उद्योगधंद्यांतील जे तज्ज्ञ आहेत, त्यांचा सल्ला हा लिंक्डइनच्या माध्यमातून घेता येतो. ज्यावेळी तुमची प्रोफाईल ही ‘पेड प्रोफाईल’ असते, त्यावेळी हे असे सल्ले देणारे लोक तुम्हाला थेट संपर्क साधतात. वेगवेगळे समाजमध्यमांचे वापरकर्ते आपोआप याच्याशी जोडलेले असतात. ते या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. आपल्या व्यवसायामध्ये वाढ होते. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एसएमएसचा वापर लिंक्डइनमार्फत मोठ्या प्रमाणावर केला जातो. यासाठी ज्या ज्या लोकांना आपल्याला लिंक्डइनवरती खाते बघण्यासाठी बोलवायचे आहे, त्यांची माहिती आपण तिथे समाविष्ट करु शकतो आणि त्याआधारे आपण लोकांना एसएमएस, फोन कॉल, मेल पाठवू शकतो आणि मग त्याआधारे आपण आणखी जास्त लोकांना जोडू शकतो. वेगवेगळ्या देशातील लोकांनासुद्धा आपल्या उत्पादनाची माहिती, नोकरीची माहितीसुद्धा देऊ शकतो. लिंक्डइनचे नेटवर्क २०० देशांमध्ये असल्यामुळे इतर देशांमध्ये आपण आपले कार्यक्षेत्र वाढवू शकतो. नोकरदारांनासुद्धा इतर देशांमध्ये नोकरी शोधण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो. हेही लिंक्डइनची लोकप्रियता वाढण्यामागचे आणखीन एक कारण आहे.

लिंक्डइन आणि इतर सोशल मीडियातील फरक

लिंक्डइनमध्ये व्यक्तिगत माहिती न देता व्यावसायिक माहिती, आपल्या कामाची माहिती, आपल्यातील कुशलतेची माहिती दिली जाते. त्यामुळे याचा गंभीरपणे उपयोग जो आहे तो केला जातो. त्यामार्फत लोकांना जोडले जाते. त्यामुळे लिंक्डइनवर दाखल होणारे नेटकरी नोकरीच्या शोधात किंवा स्वत:च्या व्यवसायवृद्धीसाठी या बिझनेस नेटवर्किंगवर आधारित समाजमाध्यमाचा वापर करताना दिसतात. लिंक्डइनच्या धरतीवर आता समाजमाध्यमे सुरू झाली आहेत. त्यामार्फत तुम्ही तुमची नोकरी किंवा व्यवसाय वाढवू शकता. मात्र, लिंक्डइनची कंपनी मायक्रोसॉफ्ट असल्याने त्याचा आपोआप फायदा होतो. त्याच्या ब्रॅण्डनेमचा फायदा लिंक्डइनला होताना दिसतो. त्याची सगळी कार्येसुद्धा अमेरिकेतून चालतात. त्याचबरोबर व्यावसायिक नीतीमूल्यांची जोपासना इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा लिंक्डइनमार्फत सर्वाधिक केली जाते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील माऊन्टन व्ह्यू येथे लिंक्डइनचे मुख्य कार्यालय आहे. मायक्रोसॉफ्टची सातत्याने देखरेख असल्याने आणि मायक्रोसॉफ्टच्या ब्रॅण्डनेमचा फायदा मिळत असल्याने लिंक्डइनच्या कार्यामध्ये किंवा त्याच्या व्याप्तीमध्ये दिवसेंदिवस आणखी जास्त झपाट्याने वाढ होत आहे, असे आपण म्हणू शकतो.

                                                                                                                                              - प्रा. गजेंद्र देवडा

                                                                                                                                              udyogvivek@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.