मराठी खाद्य संस्कृती जपणारा उद्योग

उद्योग कोणताही असो, त्याची सुरुवात होते ती म्हणजे एका वेगळ्या कल्पनेपासूनच... ठाण्यातील यशस्वी उद्योजिका भारती वैद्य यांची कहाणीही अशीच सुरू झाली. एका छोट्याशा खोलीत सुरू झालेला धनश्री गृहउद्योगाचा ग्राहकवर्ग आज सातासमुद्रापार विस्तारला आहे. घरात कुणी नसताना पाच मिनिटात तयार होतील, असे मराठमोळे पदार्थ ‘रेडी टू कूक’ या रूपात ग्राहकांना करून देता येतील का? असा विचार भारती वैद्य यांच्या मनात आला. रुचकर, खमंग आणि चविष्ट मराठमोळे पारंपरिक पदार्थ नव्या रूपात ग्राहकांना मिळू लागल्याने देश-परदेशातून मागणी वाढत गेली आणि व्यवसायाचे छोटेसे रोपटे आज कोट्यवधींची उलाढाल करणारा वटवृक्ष बनले आहे.

उद्योजकाचे नाव : भारती वैद्य (संस्थापक)

कंपनीचे नाव : धनश्री गृहउद्योग

कंपनीचे उत्पादन : रेडी टू कूक फूड

व्यावसायिक कार्यक्षेत्र : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय

वार्षिक उलाढाल : १ कोटी

प्रेरणास्त्रोत : राजा वैद्य

कर्मचारी संख्या : १६

भविष्यातील लक्ष्य : परदेशात व्यवसाय विस्तार

सन २००० साली केवळ घरखर्च निघावा म्हणून पती-पत्नीने सुरू केलेल्या धनश्री गृहउद्योगाच्या उत्पादनांची चव आज लाखो लोकांच्या जिभेवर रेंगाळत आहे. भारती वैद्य आणि राजा वैद्य यांनी सुरुवातीला ग्राहकपेठा, छोटे व्यापारी, खाद्य प्रदर्शने यांपासून विपणनाला सुरुवात केली. व्यवसायाच्या विस्तारात राजा वैद्य यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनानंतर पुढच्या पिढीने या उद्योगाची धुरा यशस्वीपणे पेलली आहे, किंबहुना विस्तारली आहे. विदुला आमडेकर आणि अदिती लेले या त्यांच्या दोन मुली स्वतःच्या क्षेत्रात यशस्वी आहेतच पण व्यवसाय विस्तार करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.  

 वैद्य कुटुंबीयांच्या दोन्ही मुली स्वतःचे क्षेत्र बाजूला सारून व्यवसायात उतरल्या आहेत. विदुला या माध्यम क्षेत्रात कार्यरत होत्या, तर अदिती वैद्यकीय क्षेत्रात. व्यवसायाचा कसलाही अनुभव गाठीशी नसताना त्यांनी वडिलांच्या जाण्यानंतर उद्योगाचा भार सांभाळला आणि यशस्वीरित्या पेललाही. स्वतःच्याच घरात सुरू केलेल्या या गृहउद्योगात सुरुवातीला दोन नंतर चार अशी कर्मचार्‍यांची संख्या वाढत गेली. प्रामुख्याने २००५ मध्ये धनश्री गृहउद्योग व्यवसाय उभारणीला वेग आला. उद्योग विस्तारासाठी वितरण आणि विपणन योग्यरितीने व्हायला हवे होते. त्यामुळे त्यादृष्टीने पाऊल उचलत मुंबईतील बाजारपेठांतील सहकार भांडारांमध्ये मालाची विक्री करण्यावर वैद्य यांनी भर दिला. आजमितीस शंभरहून अधिक दुकानांमध्ये धनश्री गृहउद्योगाची उत्पादने उपलब्ध आहेत. त्याचवेळेस बिग बाजारमध्येही ही उत्पादने ठेवली जाऊ लागली. या बाजारपेठांमध्ये उतरताना उत्पादने विशिष्ट स्वरूपात द्यावी लागतात. पदार्थातील प्रथिनांचे मूल्य, छापील किंमत, बारकोडिंग आदी बसवून उत्पादने बाजारात उतरवली. आज स्टार बाजार, रिलायन्स, हायपरसिटी आदींसह मुंबई आणि प्रमुख शहरातील मॉल्समध्ये धनश्री गृहउद्योगाची उत्पादने उपलब्ध आहेत.

वैद्य यांच्या मते व्यवसाय विस्ताराची संधी तुम्हाला नेहमीच मिळत असते. आम्ही मॉल संस्कृतीला नकार देत छोट्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले असते, तर आज व्यवसायाच्या कक्षा स्थानिक बाजारपेठांपर्यंत सीमित राहिल्या असत्या. त्यानंतर उत्पादने किरकोळ बाजारपेठांतही उपलब्ध होऊ लागली. उपवासाचे पदार्थ, डाळ, भात, खीर, शिरा, उपमा, कांदेपोहे, पिठले, थालीपीठ, झुणका, कुळीथ पिठले, भाज्या आणि मसाल्याचे विविध पदार्थ बंद पाकिटातील ६० प्रकारची उत्पादने धनश्री गृहउद्योगातर्फे तयार केली जातात. ही सर्व उत्पादने दिलेल्या मार्गदर्शनानुसार केवळ पाच मिनिटांत तयार होत असल्याने ग्राहकांचीही मागणी वाढली. विशेषतः देशविदेशात शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, गृहिणी आदींसाठी सोयीस्कर ठरले. सुरुवातीला केवळ खाद्य प्रदर्शनांमध्ये उपलब्ध असणारे पदार्थ आज महाराष्ट्र, कर्नाटक तसेच परदेशातही पोहोचले आहेत. भारती वैद्य यांनी पदार्थांची सुरुवातीपासूनची चव आजही कायम राखली आहे. पदार्थ टिकवण्यासाठी परंपरेनुसार मिळालेल्या क्लृप्त्या त्यांना आजही कामी येतात. मुख्यतः मागणीनुसार पदार्थांच्या चवी, वेष्टन आदींमध्ये सुधारणा करण्यावर त्यांचा भर असतो. याचा थेट परिणाम मागणीत दिसून आला. मागणी वाढत गेल्यानंतर जागेचा, मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचा अभाव जाणवू लागला. यानंतर २०१७ मध्ये ठाण्यातील खोपट येथे औद्योगिक वसाहतीत धनश्री गृहउद्योगाची फॅक्टरी आणि ऑफिस सुरू झाले. आज प्रत्यक्ष १५ ते १६ कर्मचारी या उद्योगावर अवलंबून आहेत. उद्योग उभारणीसाठी इतर व्यवसायात मोठ्या प्रमाणावर भांडवल, यंत्रसामग्री लागते. मात्र, या उद्योगात सुमारे ८० टक्के साधनसामग्री घरगुती असल्याने ती अडचण टळली. लहान स्तरावर सुरुवात केल्याने त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून उद्योगाच्या रोपट्याला विस्ताराचे खतपाणी मिळत गेले.

विदुला आणि अदिती यांनी लक्ष घातल्याने वडिलोपार्जित व्यवसायाला नवसंजीवनी दिली. व्यवसायाच्या कक्षा रुंदावत ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध होईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि  www.dhanashreegruhaudyog.com या संकेतस्थळाची सुरुवात केली. उत्पादनांवर वेबसाईट झळकू लागल्यानंतर त्याद्वारेही मागणी वाढत गेली. त्याशिवाय अ‍ॅमेझॉन, प्लेस ऑफ ओरिजिन, फ्लेवर्स ऑफ माय सिटी, फूड मेमरीज आदींवर ही उत्पादने उपलब्ध आहेत. साधारणतः ऑर्डर मिळाल्यानंतर तीन दिवसांत उत्पादन पोहोचेल, याची खबरदारी घेतली जाते. दिवाळीनिमित्त बनवला जाणारा फराळही या वेबसाईटवर सध्या उपलब्ध आहे. करंजी, लाडू, चिवडा, चकली आदी सर्व फराळ आकर्षक पॅकिंगमध्ये भेटवस्तू म्हणून आप्तेष्टांना देता येईल, अशा स्वरूपात पुरवला जातो. ३५० रुपयांपासून फराळ उपलब्ध आहे. विस्तार हे प्रमुख ध्येय ठेवणाऱ्या धनश्री गृहउद्योगाने डिजिटलमंचावर आणखी सशक्त होण्याचे ठरवले आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वितरणाचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात येणार आहे. उद्योगासह समाजिक दायित्त्वाचा वसाही भारती वैद्य यांनी कायम ठेवला आहे. दिवाळीनिमित्त फराळ वाटप, अनाथ मुलांना खाऊ वाटप आदी कार्यक्रम राबवले जातात. भारती वैद्य यांना त्यांच्या कामगिरीबद्दल उद्योगक्षेत्रातल्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ९६१९१५४१४०/७५०६७२३०८०

                                                                                                                                      - प्रतिनिधी, महा एमटीबी

                                                                                                                                      udyogvivek@gmail.com

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.