पेपर बॅग निर्मिती व्यवसाय

सरकार नागरिकांमध्ये प्लॅस्टिक व त्यासंबधी वस्तूंच्या धोक्यांबद्दल जनजागृतीचे उपक्रम राबवत आहे. अनेक राज्यात प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्या वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असून भविष्यात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर जवळपास बंद होऊन कागदी पिशव्यांचा वापर केला जाईल याची काळजी घेतली जात आहे. प्लॅस्टिक पिशव्यांवर सरकारने बंदी घातल्यामुळे कागदी पिशवी निर्मितीच्या व्यवसायात उतरण्यासाठी ही सुयोग्य वेळ आहे. या लेखात मी कागदी पिशवी निर्मिती व्यवसायांबद्दल माहिती सांगणार आहे.

आकर्षक डिझाईन असलेल्या, पर्यावरणास अनुकूल अशा कागदी पिशव्यांची मागणी वाढलेली आहे. शॉपिंग मॉल्स, स्टेशनरी व जनरल स्टोअर्स, किराणा मालाचे दुकान, फळे व भाज्यांची दुकाने तसेच औषधांच्या दुकानात या पिशव्यांची प्रचंड  मागणी आहे. या पिशव्या दिसण्यास आकर्षक, स्वस्त व ईकोफ्रेंडली असल्याने याची मागणी वाढते आहे व त्यांचे रीसायकलिंग देखील करता येते. किमान ३०० चौ. फुट जागेत हा व्यवसाय सुरू करता येईल. या व्यवसायासाठी किमान १० लाख रुपये भांडवल लागते. वीज, पाणी व स्टोअरेज स्पेस यांची सोय असावी. या व्यवसायासाठी स्वयंचलीत (ऑटोमेटिक) यंत्रसामुग्री आवश्यक असते. त्याची किंमत ५ लाखांपासून सुरू होते. ऑटोमेटिक मशीनमुळे मनुष्यबळ कमी लागते. या मशीन द्वारे दररोज ३ ते ५ हजार प्रिंटेड पिशव्या बनवता येतात. या व्यवसायासाठी पेपर रोल, डिझाईन व लोगो प्रिंटींगसाठी प्रिंटींग शाई, गोंद, दोरी इत्यादी कच्चा माल लागतो. या कागदी पिशव्यांचे मार्केटींग करण्यासाठी सोशलमीडिया, वेब वेबसाईट, मोबाईल अॅप, व्हिडीओज, एसईओ, जाहिराती, ई-कॉमर्स इत्यादी माध्यमांचा वापर केला जातो. तसेच इंडियामार्ट, अलीबाबा डॉटकॉम, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन यासारख्या पोर्टल्सवर ही रजिस्ट्रेशन करता येईल. डिलर्स, रिटेलर्संना भेटूनही या उत्पादनाचा पुरवठा केला जाऊ शकतो.

पेपर बॅग व्यवसायास उत्तेजन देण्यासाठी शासनातर्फे उपक्रम राबवले जातात. या व्यवसायाचे सरकारी नियमांनुसार नोंदणीकरण करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक ते सर्व परवाने व प्रमाणपत्रे प्राप्त करणे गरजेचे आहे. या व्यवसायासाठी  बँका, पतसंस्था तसेच इतर मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वित्तपुरवठा केला जातो. तसेच शासनाच्या एमएसएमई योजनेतूनही वित्त सहाय्य मिळते. खादी ग्रामोद्योग योजनेमार्फत ट्रेनिंग व सबसिडीचा लाभ घेता येईल. या व्यवसायातून दरमहा किमान २० ते ३० टक्के नफा कमावता येतो (नफा मार्केट स्थिती व स्पर्धा यावर अवलंबून). एक्सपोर्ट ऑर्डरही मिऴू शकतात.

– प्रा. प्रकाश भोसले

ebrandingindia2017@gmail.com

व्हॉटसअॅप नंबर - ९८६७८०६३९९

(लेखक ‘ई-ब्रॅण्डिंग’ या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी तब्बल एक तप विविध बी2बी पोर्टल्स व ‘गुगल’ सर्च इंजिनसोबत काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्रभरात उद्योजकता विकासाचे काम करत आहेत.)

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.