'मिंट' या इंग्रजी वृत्तपत्राने नुकताच एक अहवाल सादर केला, जो भारतातल्या रोजगाराच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारा आहे. हा अहवाल एका वेगळ्या पद्धतीने तयार केला गेला आहे...
भारतात रोजगार किती उपलब्ध आहेत आणि बेरोजगार लोक किती आहेत एवढंच हा अहवाल सांगत नाही तर त्याचं जिल्ह्यानुसार वर्गीकरण या अहवालात केलं गेलं आहे. २००१ आणि २०११ च्या जनगणनेच्या आधारावर भारतातल्या रोजगार स्थितीचं जिल्ह्यावर मूल्यमापन करण्यात आलं आहे आणि २००१ ते २०११ या दहा वर्षांच्या काळात त्यात झालेले बदल अभ्यासले गेले आहेत.
या अहवालानुसार भारतातलं रोजगाराचं सगळ्यात जास्त प्रमाण दमण जिल्ह्यात (९०.८%) आहे. त्याखालोखाल मध्य दिल्ली (९०.५%), पूर्व दिल्ली(९०%), पश्चिम दिल्ली(८९.६%) आणि उत्तर दिल्ली(८९.४%) असं आहे. सर्वाधिक रोजगार असलेल्या पाच जिल्ह्यांमधील चार जिल्हे हे दिल्ली या राज्यात एकवटलेले आहेत. त्याखालोखाल बंगळूर (७५.७%), मुंबई-पुणे (७१.५%), चेन्नई (६६.२%), हैद्राबाद (५९.२%), कोलकाता (५५.३%) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या लोकसंख्या जास्त असलेल्या राज्यांतील जिल्ह्यांत २००१ ते २०११ या काळात रोजगारवाढ दिसून आलेली नाही. या राज्यांमध्येच रोजगारांची मागणी जस्त आहे. भारतातलं मंदावलेलं उत्पादनक्षेत्र याला कारणीभूत आहे, असं हा अहवाल सांगतो. २०११ च्या जनगणनेनुसार भारतातल्या ६४० जिल्ह्यांपैकी फक्त २६ जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या उत्पादन क्षेत्रात गुंतलेली आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये उत्पादन क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण २००१ ते २०११ या काळात घटलेलं आढळून आलेलं आहे.
भारताच्या कोणत्या भागात कोणते क्षेत्र रोजगाराच्या बाबतीत प्रबळ आहे याचाही नकाशा या अहवालात तयार करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात-महाराष्ट्राचा पश्चिम भाग, कर्नाटकाचा दक्षिण भाग आणि उत्तर पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये शेती क्षेत्रात सर्वाधिक लोकसंख्या गुंतलेली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, उडीसा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. पंजाब, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या अगदी ठराविक भागांमध्ये उत्पादन क्षेत्र प्रबळ आहे. जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही संरक्षण व्यवसायात गुंतलेली आहे. पंजाब आणि आसाम राज्यातील अगदी अत्यल्प भाग व्यापार क्षेत्रात गुंतलेला आहे. केरळ आणि तामिळनाडू राज्याच्या दक्षिण भागांमध्ये खाणकाम व्यवसाय प्रबळ आहे. याव्यतिरिक्त इतर सेवा क्षेत्रे ही सर्व दिल्लीमध्ये एकवटलेली आहेत. हा अहवाल रोजगाराचं जिल्हानिहाय आणि क्षेत्रनिहाय वितरण दर्शवतो. भारतात एकंदर रोजगार किती प्रमाणात निर्माण झाले यापेक्षा ते कुठे आणि कुठल्या क्षेत्रात निर्माण झाले हे या अहवालातून समजू शकतं. रोजगारांचं ठरविक भागात केंद्रीकरण होणं ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फारशी चांगली गोष्ट नाही. रोजगारांचं केंद्रीकरण कुठे होतंय आणि कुठे रोजगाराला जास्त मागणी आहे ते पाहून त्यादृष्टीने पुढची पावलं टाकावी लागतील.
- संपादकीय