तीन पिढ्यांचं घर ‘साडीघर’

भारताच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मोठा महोत्सव लाल किल्ल्यावर पार पडलेला. त्या कार्यक्रमात स्वामी समर्थ व्यायाम मंदिराच्या मुलींनी ‘साडीघर’च्या रेडिमेड नऊवारी साड्या नेसून आपले कौशल्य सादर केले होते. त्या 'साडीघर'विषयी... 

दादर... मुंबईतल्या मराठी माणसाचा मानबिंदू. त्यातला प्रमुख रस्ता म्हणजे रानडे रोड. या रस्त्यावर १९३० - ४० च्या आसपास एक टपरीवजा दुकान होतं. सागरनाथ नावाचा तरुण त्या टपरी बाहेरच्या फुटपाथवर झोपायचा. तसा सागरनाथ मूळचा डहाणू परिसरातला. शेती हा मूळचा कौटुंबिक व्यवसाय. मात्र, सागरनाथला उद्योग उभारायचा होता. दादर परिसर हा उद्योगासाठी तसा पूर्वीपासून पोषक. सागरनाथांनी याच रस्त्यावर एक टपरीवजा दुकान घेतलं. एका ओळखीच्या व्यक्तीला ते चालवायला दिलेलं. मात्र, त्या व्यक्तीने फसगत करून ते दुकान बळकावलं. पंचविशीतल्या सागरनाथासाठी हा तसा धक्काच होता. मात्र, ‘लाथ मारेन तिथे पाणी काढेन,’ असा बाणा असलेल्या सागरनाथने कंबर कसली आणि रानडे रोडवर ५७०० रुपयांमध्ये दुकान विकत घेतलं. त्याकाळी सोने ३६ रुपये तोळे होते. यावरुन ५७०० रुपयांची किंमत लक्षात आली असेल. या दुकानात सायकल आणि नवीन ट्रंका विकल्या जायच्या. भाच्याच्या नावाने सुरू झालेले अरविंद स्टोअर्स अल्पावधीतच दादरमध्ये नावारूपास आले. ही उद्योजक कथा आहे तीन पिढ्यांची. सागरनाथ, राजन आणि गौतम या तीन पिढीच्या उद्योजकांची. राऊत कुटुंबीयांची.

त्याकाळी भांड्यांचं प्रस्थ मोठंच होतं. लग्नात हंडा-कळशी वा टाकी देणं मानाचं समजलं जाई. अगदी ताट, वाटी, ग्लास, चमचे, कुंकवाचा करंडा असा पाच भांड्यांचा आहेरसुद्धा मानाचा समजला जाई. त्यावेळी सिलोवर कंपन्यांची भांडी प्रसिद्ध होती. त्याची एजन्सी दादोबा ठाकूर यांच्याकडे होती. त्यांच्याकडून अरविंद स्टोअर्समध्ये भांडी यायची. त्या काळात असं गमतीने म्हटलं जायचं की, राऊतांकडच्या भांड्यांचा आहेर म्हणजे लग्नाचा आहेर. त्या जमानातल्या अनेक मराठी कलावंतांनी त्यांच्याकडून भांड्याची खरेदी केलेली आहे. सागरनाथांचे भाऊ डॉ. मधुकर बळवंत राऊत. व्यवसायाने डॉक्टर. शिवाजी पार्कमधील एका रस्त्याला डॉ. एम. बी. राऊत असे नाव दिलेले आहे. दोघा भावांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. जणू काही राम-भरतच. डॉक्टरांचे अकाली निधन झाले आणि त्याचा प्रचंड धक्का सागरनाथांनी घेतला. बंधु वियोगाने त्यांना इतका मानसिक धक्का बसला की, ते स्मृतिभ्रंश झाल्यासारखे वागू लागले. त्यांना दोन मुले होती. राजन आणि सुनील. राजनला लहानपणापासून पोलिओ आहे. या दोन्ही मुलांना बाबांच्या व्यवसायात रस नव्हता. राजन यांना शेतीमध्ये, तर सुनील यांना अॅम्ब्युलन्स चालविण्यामध्ये विशेष रस होता. सागरनाथांच्या या आजारपणाच्या काळात साथ दिली ते शाळिग्राम पुरव आणि सरोज रेगे या एकनिष्ठ आणि प्रामाणिक असलेल्या दोन्ही कर्मचार्यांनी. शाळिग्राम हे ४५ वर्षे तर सरोज या४० वर्षे सेवेत होत्या. बाबांची अवस्था पाहून दुकानाचा वारसा पुढे नेण्याचा निर्णय राजन राऊत यांनी घेतला. यावेळी राजन यांना त्यांच्या पत्नी छाया आणि कन्या ममता यांनी अगदी सावलीसारखी सोबत केली.

दरम्यानच्या काळात खूप बदल झाला होता. निव्वळ भांडी विकून दुकान उत्तम चालेल, असं नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी साड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांचा एक गुजराती भागीदार होता. निव्वळ २ टक्के नफ्यामध्ये ते साड्या विकत. अक्षरश: दादर स्टेशनपर्यंत साड्या खरेदी करण्यासाठी रांग लागायची. ६ रुपयांपासून साड्यांची किंमत सुरू व्हायची. सगळ्यात महागडी साडी १३ रुपये ७५ पैशांची होती. या साड्यांमध्ये काही साड्या खराब निघायच्या. या खराब साड्यांचं करायचं काय हा एक यक्ष प्रश्नच होता. त्यावेळी राजन राऊत यांचे भागीदार पुण्याला गेले. तिथे साड्या बांधल्या जायच्या. ते तंत्र त्यांनी जाणून घेतले. तिथली एक साडी ते सोबत घेऊन आले. ती साडी पूर्ण उघडली. ते तंत्र त्यांनी सरोज रेगेंना शिकवले आणि बांधणीच्या साड्यांची सुरुवात झाली. या दरम्यान राजन राऊतांचा मुलगा गौतम ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शिकत होता. व्यवसायाची आवड होती, पण साड्यांच्या दुकानात त्याला तितकासा रस नव्हता. त्याला उलट ड्रायफ्रूट्सच्या दुकानात जास्त रस होता. १९९७ साली मात्र राजन राऊत यांचा दुर्दैवी अपघात झाला. त्यांच्या स्कूटरला गाडीने उडवलं. दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला. डॉक्टरांनी राऊतांना तीन महिन्यांची सक्तीची विश्रांती सांगितली. राजन यांनी गौतमला बोलावले. त्याच्याकडे दुकानाची चावी देत म्हणाले, “आजपासून तू दुकान सांभाळायचंस. इथून पुढे तूच निर्णय घ्यायचे.” अचानक आलेल्या या जबाबदारीने २२ वर्षांचा गौतम गडबडला पण ही जबाबदारी सार्थ ठरवायची, हे त्याने मनोमन निश्चित केले.

तो दुकान सांभाळू लागला. गिर्हाईके यायची आणि नऊवारी साडी मागायचे. आपल्या दुकानात नऊवारी साड्या का नाहीत, हा प्रश्न त्याला पडला. काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने रेडिमेड नऊवारी साडी विकायचा विचार केला. पहिली साडी त्याने सकाळी १०.३० वाजता शिवायला घेतली ती रात्री ९.३० वाजेपर्यंत त्याने शिवली. हा त्याचा पहिलाच अनुभव. त्याच्या मेहनतीला रंग आला. कल्याणच्या एका व्यापाऱ्याने २६ रेडिमेड साड्यांची ऑर्डर दिली. इथे एक वेगळी सुरुवात झाली. दुकानाचा कायापालट झाला. ‘साडीघर’ नावाचं महिलांच्या हक्काचं साड्याचं माहेरघर सुरू झालं. एका मशीनपासून सुरू झालेला हा प्रवास २२ मशीनपर्यंत पोहोचला. दादरच्या रानडे रोडवर ‘साडीघर’ नावाच्या या दुकानात माहीम, डहाणू येथील कारखान्यांमधून अंदाजे ३० कामगार कार्यरत आहेत. सचिन तेंडुलकरने ३५ शतकांचा विक्रम केला. त्यानिमित्त मराठी पत्रकारांनी त्याचा सत्कार केला होता. त्यासाठी साड्या आणि मराठी पेहराव ‘साडीघर’ने पुरविल्या होत्या. भारताच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मोठा महोत्सव लाल किल्ल्यावर पार पडलेला. त्या कार्यक्रमात स्वामी समर्थ व्यायाम मंदिराच्या मुलींनी ‘साडीघर’च्या रेडिमेड नऊवारी साड्या नेसून आपले कौशल्य सादर केले होते. राष्ट्रपती भवनात मॉरिशसच्या मुलांनी आपली कला सादर केली होती. त्यांचे पेहराव साडीघरने डिझाईन केले होते. आता ‘साडीघर’ पगड्यांच्या निर्मितीमध्ये उतरले आहेत. विविध पौराणिक चित्रपट, मालिका, नाटक यामध्ये वापरले जाणारे बहुतांश पगडी, साड्या या साडीघरातून पुरविल्या जातात.

गौतम राऊत हे या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना त्यांची पत्नी सोनल यादेखील तेवढ्याच समर्थपणे साथ देत आहेत. रानडे रोडवरून चालताना डाव्या बाजूस गौरीचे मुखवटे लक्ष वेधून घेतात. दिसायला छोट्या असणाऱ्या या दुकानाची कीर्ती अगदी सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. मराठी माणसं व्यवसाय करू शकतात, तो विस्तारू शकतात आणि सातासमुद्रापार नेऊ शकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘साडीघर.’ खरंतर ‘साडीघर’ने मराठी संस्कृती सातासमुद्रापार नेली आहे.

- प्रमोद सावंत

udyogvivek@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.