'सर्जना'ची उद्योजकता

'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळयावाचुनि झुलायचे।'

प्रत्येक स्त्रीला तिचे स्वत्व उमगले की, तिच्या स्वप्नांना जणू आकाश ठेंगणे होते. स्वत:तल्या सर्जनशीलतेने स्त्री अधिकाधिक उमलत जाते. भवताल सुगंधित करते आणि तो दरवळ चहूबाजूंना पसरतो. अनेक घरांना बहर देतो. माझ्या बाबतीत असेच झाले. माझे छोटेसे जन्मगाव कोठूर, राहुरी आणि नाशिक या तिठयापलीकडे कधीच न गेलेली मी आता व्यवसाय, प्रशिक्षणांच्या निमित्ताने भरपूर फिरते. 'मिरर' फाउंडेशनच्या निमित्ताने खेडयातली एक सामान्य मुलगी ते एक यशस्वी उद्योजिका हा माझा प्रवास अनेकांच्या साथीने आणि माझ्यातल्या इच्छाशक्तीने सुंदर केलाय. पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्स 'चारू' या ब्रँडखाली बाजारात आणण्याची संकल्पना सुचली, ती प्रत्यक्षात आली आणि उद्योजक म्हणून मला ओळख मिळाली.

मी नेहा खरे, पूर्वाश्रमीची चारुशिला डोंगरे. माझे माहेर निफाड तालुक्यातल्या कोठूर या छोटया गावातले. खेडयातल्या वातावरणात मी लहानाची मोठी झाले. घरात भावंडात मी मोठी. गावाकडे मुलींना अगदी शालेय वयातच स्वयंपाक येणे गरजेचे समजले जाते, तसेच माझेही होते. मला वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची फारच आवड होती. चार काकांची कुटुंबे आणि आम्ही एकत्र राहायचो. शिक्षण झाल्यानंतर सासरी नगर जिल्ह्यातल्या राहुरीला आल्यावरही बाहेरचे जग फारसे बघितले नव्हते. मी पार्लरची पायरी चढायला एक निमित्त घडले आणि पुढचे माझे आयुष्यच बदलले.

सन २००४पर्यंत मी गृहिणीच होते. माझे बाळ सहा महिन्यांचे झाले, त्या वेळी आमच्या घरी हळदीकुंकू होते. शेजारच्या काकूचे ब्युटी पार्लर होते. त्यांनी सासूबाईंना मला पार्लरच्या कोर्सला पाठवण्याबाबत विचारले. डॉक्टर असलेल्या माझ्या सासूबाईंनी मला ब्युटी पार्लरच्या कोर्सला जायला प्रोत्साहन दिले. कोर्स पूर्ण झाल्यावर सुरुवातीला घरी पार्लर सुरू केले. सौंदर्यक्षेत्रात माझा चांगलाच जम बसायला लागला होता आणि बरोबरीने पार्लरचे कोर्सेसही घेऊ लागले. नंतर लक्षात आले, मी उत्तम पध्दतीने शिकवू शकते. पण माझ्या या वाटचालीबाबत सासूबाई समाधानी नव्हत्या. त्या म्हणाल्या, “तू फक्त एक दुकान टाकण्यापुरते शिकायचे नाहीयेस, मुंबईला जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घ्यायचे आहेस.’’ नवऱ्यानेही या विचारांना पाठबळ दिले.

सासूबाई मला सिडेस्कोची परीक्षा द्यायला मुंबईला घेऊन गेल्या. तिथे मी स्किन, अरोमा, हेअर या तिन्हीमध्ये ग्रॅज्युएशन केले. नंतर सिबॅटॅकचीही परीक्षा दिली. त्यानंतर मुंबईतील ‘बी ब्लंट’ नावाच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या हेअरकट ऍकॅडमीमध्ये शिकले. मुंबईतच अल्टरनेट मेडिसिनचे आणि कॉस्मेटॉलॉजीचेही शिक्षण घेतले. माझ्या सासूबाई म्हणाल्या, “तू शिकली पाहिजेस, मूल मी सांभाळते.’’ मुंबईमध्ये सौंदर्यशास्त्र शिकताना मीही नखशिखान्त बदलले. सलवार कुर्ता घालत असे, तेव्हा बी ब्लंटमध्ये येणारे “गावाकडची आहेस का?’’ असे विचारत. कारण तिथे आमीर खान, बिपाशा बसू यासारखे बॉलिवूड तारेही येत. मग मीही स्वत:च्या लूकबद्दल विचार करत गेले आणि स्वत:च्या इमेज बिल्डिंगसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. कपडे, बोलणे, ऍटिटयूड यावर बरीच मेहनत घेतली. नाशिकला परतल्यावर कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोडलाही पार्लर सुरू केले.

नाशिकमध्ये स्वत:च्या अद्ययावत अशा सौंदर्य दालनांची साखळी निर्माण करताना त्याचे नावही ट्रेन्डी हवे, म्हणून ‘मिरर’ ठेवले. गेल्या १५ वर्षांपासून ‘मिरर सलोन ऍकॅडमी’ चालवते आहे. पार्लरमध्ये एकदा बारा वर्षांची, केस गेलेली एक मुलगी आली होती. त्या कर्करुग्ण मुलीला केसांचा विग हवा होता. चांगल्या प्रतीचा विग खूप महाग असल्यामुळे तिच्या आईला तो खरेदी करता येत नव्हता. हे पाहून माझे मन कळवळले. त्याच दरम्यान माझी मावशीही स्तनाच्या कर्करोगाला बळी पडली होती. केमोथेरपीमुळे तिचे पुंजक्यांनी गळणारे केस जवळून पाहिले होते. आपण मुली, स्त्रिया आपल्या दिसण्याबाबत जास्तच जागरूक असतो. केसांबाबत संवेदनशील असतो. याचा विचार करून मी ठरवले, कर्करुग्ण मुली व स्त्रियांसाठी आपणच एक उपक्रम राबवायचा. ज्या स्त्रिया आपले दोन इंच केस मला दान करतील, त्यांचा हेअरकट मोफत करायचा आणि या केसांचा चांगला विग कर्करुग्ण महिलांना उपलब्ध करून द्यायचा. या उपक्रमांतर्गत आम्ही तीन दिवसांत ८४ हेअरकट केले. हे काम मी तीन वर्षांपासून सातत्याने करते आहे. महाविद्यालयीन मुलींचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. हा उपक्रम राबवताना पंधरा मिनिटे आधी आम्ही स्तनाच्या कर्करोगाच्या जाणीवजागृतीसाठी प्रसिध्द कर्करोगतज्ज्ञ डॉ. राज नगरकर यांची जाणीवजागृती करणारे भाषण आयोजित करतो. कर्करोगाविरुध्दच्या लढयात एक सौंदर्यतज्ज्ञ म्हणून आपणही सहभागी होऊ  शकतो, हे जाणवले.

स्तनाच्या कर्करोगाबद्दल जाणीव निर्माण करण्याबरोबरच स्त्रियांच्या दर महिन्याला येणाऱ्या पाळीच्या संदर्भातही काम करायचे, असे मिरर फाउंडेशनने ठरवले. पाळी हे महिलांसाठी वरदानच आहे, कारण त्याद्वारे निसर्गाने तिला सर्जनाची शक्ती दिलीय. ‘मासिक स्राव हा शाप नसून वरदान आहे’ म्हणून पाळीविषयी जाणीवजागृती करणाऱ्या उपक्रमाचे नाव ठेवले, ‘ब्लेस्ड टू ब्लीड’. याविषयी काम करायलाच हवे, हे सुचले ते प्रवासादरम्यान. व्यवसायानिमित्त माझा भारतभर बराच प्रवास होतो. दरम्यानच्या काळात सार्वजनिक शौचालयात जाण्याची वेळ आली, तर तिथली परिस्थिती भीषण असते. कमोड कसा वापरायचा हे जसे अनेक जणींना माहीत नसते, तसेच पाळीच्या पॅड्सची विल्हेवाट कशी लावायची हेही कळत नसते. त्याचा परिणाम अतिशय अस्वच्छ आणि तुंबलेली सार्वजनिक शौचालये. बऱ्याच जणी तसेच पॅड शौचालयाच्या भांडयात टाकतात आणि आपला देश अस्वच्छ करण्यास हातभार लावतात. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही जागतिक आरोग्य दिनापासून आठवडाभर महिला मंडळांमध्ये जाऊन मासिक पाळीविषयी जागृती निर्माण करतो.

पॅड कसे वापरायचे, त्याची विल्हेवाट कशी लावायची, याचे प्रशिक्षण देतो. साध्या माठातही विशिष्ट प्रकारे जाळून हे पॅड नष्ट करता येतात. या कामात नगरसेविकांचीही मदत घेतो आहोत. सध्या आम्ही बचत गटातील महिलांच्या सहकार्याने ‘मिरर सखी’ या नावाने पर्यावरणपूरक नॅपकिन्सही बाजारात आणतो आहोत. सॅनिटरी नॅपकिन्स - महिला बचत गट तयार करतात. एक गट निर्मिती करतो, तर दुसरा गट मार्केटिंग करतो. स्वाती बेडेकर यांच्या ‘वात्सल्य फाउंडेशन’चे आम्हाला या उपक्रमात सातत्याने र्मार्गदशन आहेच. त्याची हजार सॅम्पल्स मुलींमध्ये वाटणार आहोत. सध्या प्रचलित असलेले नामांकित कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन्स नष्ट व्हायला सहा ते आठ महिने लागतात. सॅनिटरी नॅपकिन न परवडणाऱ्या महिलांसाठी नाशिकमधील पहिली सॅनिटरी बँक सुरू  होत आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतात महाराष्ट्रात मी एकटीनेच या चार क्षेत्रात पी.जी. केले. एका कंपनीने विचारले, ब्रँड प्रमोशन करायला आवडेल का? मी तत्काळ होकार दिला. मी सौंदर्यविश्वात माझा जम बसवत असले, तरी उद्योजकतेची नवी दालने खुणावत होतीच. त्यासाठी संधीही मिळत गेल्या. सुरुवातीला मिळालेले काम मी उत्साहाने केले. त्यानंतर ५-६ कंपन्याच्या ब्रँड प्रमोशनसाठी काम केले. त्याच काळात 'पितांबरी'च्या प्रभुदेसाई यांनी आमच्या ‘चारू  ब्रँड’ची ऍम्बेसिडर होणार का, असे विचारले. ते काम करत असताना त्यांनी ‘हा ब्रँड तू टेकओव्हर का करत नाहीस?’ असेही विचारले आणि मी ‘चारू’ ब्रँड टेकओव्हर केला. त्याअंतर्गत  मी फेशियल किट्स, हेअर स्पा, हेअर जेल आउटसोर्स करून माझ्या ब्रँडअंतर्गत त्याची विक्री होते, अर्थात उत्तम दर्जा राखूनच. आता मी सामाजिक कामाच्या माध्यमातून २२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जोडून घेतलेय.

जाखोरी गाव दत्तक घेतले आहे. तिथे पिठाचा ब्रँड तयार करून त्याच गावातल्या सासू-सुनांना रोजगार देऊन सामावून घेतले आहे. आमचा बचत गट एका शाळेचे उपाहारगृहही चालवतो. ब्रँड प्रमोशनच्या निमित्ताने भरपूर भ्रमंती केली. प्रत्येक गावातील उद्योजकांना भेटले. त्यामुळे व्यवसाय वाढला. त्याचबरोबर दैनिकांमध्ये लेख लिहायला सुरुवात केली. उद्योगाचे स्वप्नच बघावे लागते. आशावाद खूप महत्त्वाचा असतो. आपण स्वत: काय करतोय, हे आपल्याला माहीत हवे.

आंत्रप्रिनरशिपसाठी मी तरुणांच्या कार्यशाळा घेते. प्रत्येकात एक उद्योजक दडलेला असतो, त्याला या कार्यशाळांमधून बळ देण्याचे काम मी करते. बायांनो, काम करा, आपल्या आजूबाजूला पाहा, नवीन जगाची ओळख करून घ्या. जी काम करू शकते, ती आयुष्यातले निर्णय चांगले घेऊ  शकते.

- नेहा खरे

शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.