तंत्रकौशल्याचे शिरोमणी

‘क्वांटिटी’ आणि ‘क्वालिटी’ हे दोघे हातात हात घेऊन चालू शकतात, याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे ‘ईच्हार इक्विपमेंट्स प्रा. लि.’ होय. सीएनसी प्रोग्रॅमवर आधारित उत्पादन हे ‘ईच्हार इक्विपमेंट्स’चे वैशिष्ट्य. रमेश पांचाळ व कीर्ती पांचाळ या दोन भावांनी आपले वडील हेमचंद पांचाळ यांच्या स्वप्नांना मेहनतीचे पंख दिले आणि हे साम्राज्य उभे केले. या तंत्रकौशल्याचे शिरोमणी ठरलेल्या पांचाळ बंधूंची ही यशोगाथा...

उद्योजकाचे नाव : कीर्ती पांचाळ, रमेश पांचाळ

कंपनीचे नाव : ईच्हार इक्विपमेंट्स प्रा. लि.

कंपनीची उत्पादने : सीएनसी मशीन, रोलिंग मिल

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

वार्षिक उलाढाल : ८५ कोटी रुपये

प्रेरणास्त्रोत : हेमचंद पांचाळ

कर्मचारी संख्या : ३०० हून अधिक

भविष्यातील लक्ष्य : दरवर्षी दुप्पट वाढ

‘गुरूकृपा इंजिनिअरिंग’च्या नावाने गाला कंपाऊंडमध्ये भाड्याने घेतलेल्या जागेत १९७८ साली हेमचंद पांचाळ यांनी भविष्यातल्या ‘ईच्हार इक्विपमेंट्स’ची पायाभरणी केली. आज इंजिनिअरिंग क्षेत्रातील भारतातील एक हरहुन्नरी, मेहनती व दर्जेदार उद्योजक म्हणून रमेश पांचाळ यांचे नाव घेतले जाते. अवाढव्य व अचूक अशा यंत्रसामुग्रीच्या निर्मितीत विलक्षण दर्जात्मक काम करून घ्यायचे असल्यास रमेश पांचाळ यांचा हात कुणीही धरू शकणार नाही आणि म्हणूनच गेली ३० वर्षे होमी भाभा अणुशक्ती केंद्र, ‘सुझलॉन’ व ‘अल्स्ट्रॉम’ यांसारख्या कंपन्यांसाठी ‘ईच्हार इक्विपमेंट्स’ आपली दर्जात्मक सेवा पुरवित आहेत. ‘गुरुकृपा इंजिनिअरिंग’ तसेच ‘ईच्हार इक्विपमेंट्स’ उभे राहत असताना कीर्ती पांचाळ यांचे शिक्षण सुरू होते. तरीदेखील सुट्यांमध्ये ते कामगारांसारखे स्वत:च्या कंपनीत अनुभव गाठीशी मिळवण्यासाठी काम करत असत. अवघ्या ११ कामगारांपासून सुरुवात झालेल्या या कंपनीत आता साडेतीनशेपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. ठाणे, भिवंडी व अंबरनाथ येथे कंपनीच्या फॅक्टरी असून जवळपास ८५ कोटी इतकी कंपनीची उलाढाल आहे, तर दोनशे कोटींची झेप आगामी दोन वर्षात घेण्याचा निर्धार ‘ईच्हार इक्विपमेंट्स’च्या चमूने केला.

"दर्जात्मक काम करणे, याला जगात कुठेही दुसरा पर्याय नाही. परदेशात होणारे संशोधन आणि तिथे उत्पादित होणाऱ्या वस्तू यांचा अभ्यास करून देशी-विदेशी बाजारपेठांत परदेशी दर्जाची स्वदेशी उत्पादने आणण्याची प्रचंड मोठी संधी नवउद्योजकांना आहे. दर्जा आणि वेगवान उत्पादन या दोन्ही गोष्टींकडे तितक्याच गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानातील बदलामुळे स्पर्धेला तोंड द्यायचे असेल, तर यासाठी नवउद्योजकांनी तयार होण्याची गरज आहे."

आज जगभरातील तेल उद्योग, अणुशक्ती उद्योग, पवनऊर्जा, हायड्रोटर्बाईन, हॉट अॅण्ड कोल्ड रोलिंग मिल्स व प्रिंटिंग मशीनच्या क्षेत्रात ‘ईच्हार इक्विपमेंट्स’चे नाव आदराने घेतले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाले, मात्र आजही भारतीय माणूस व भारतीय उद्योजक परदेशी बनावटीच्या वस्तू व मशीन्स प्रामुख्याने वापरतो. वास्तविक, हे एक प्रकारचे तांत्रिक पारतंत्र्य असून भारतीय उद्योजकांनी परदेशी उत्पादनांना तितकेच दर्जात्मक प्रत्युत्तर देत भारतीय बनावटीची उत्पादने उत्पादित करायला हवीत. आज जगाला दर्जात्मक उत्पादनांची गरज असून भारतीय उद्योजकांनी जर त्याचा ध्यास घेतला, तर परदेशी अर्थव्यवस्था आपल्यासाठी खुली आहे. हे करत असताना मालकाकडे सगळ्या प्रकारचे गुण असण्याची आवश्यकता आहे. भांडवल हाताळणी, त्याची जाहिरात व विक्री तसेच दर्जात्मक उत्पादनया बाबींकडे मालकाने गांभीर्याने पाहिले पाहिजे, असा विचार कीर्ती व रमेश पांचाळ यांच्या जीवनाचा भाग आहे. सतत नवनवीन कल्पनांचा वेध घेणे, हा त्यांच्या उद्योगवाढीमागील यशाचा मंत्र असून वेगवान विकासासोबत नैतिकता, कायदेशीर काटेकोरपणा याबाबतीत ‘ईच्हार इक्विपमेंट्स’ अत्यंत आग्रही आहेत. जगाला हेवा वाटेल, अशा पद्धतीची उत्पादने निर्माण करत असूनही कोणत्याही प्रकारचा अहमभाव त्यांच्यात नाही. एकाग्रता, ध्येयनिष्ठता आणि नाविन्याचा शोध या त्रिसूत्रीचा वापर करत ‘सीएनसी’ प्रोग्रॅमवर आधारित उत्पादन क्षेत्रात ‘ईच्हार इक्विपमेंट्स’ मैलाचा दगड ठरत आहेत. 

आज ‘ईच्हार इक्विपमेंट्स’मध्ये अनेक इंजिनिअरिंग महाविद्यालयांची मुले प्रशिक्षणासाठी येतात. भविष्यातील इंजिनिअरदेखील उच्च प्रतीच्या तांत्रिक ज्ञानाने परिपूर्ण असावेत, या उद्दिष्टाने ‘ईच्हार इक्विपमेंट्स’ कंपनी धडपडत असते. दान द्यायचेच असेल, तर ते तंत्रकौशल्याचे दिले पाहिजे, असा नव्या युगाचा मंत्र ‘ईच्हार इक्विपमेंट्स’ देऊ पाहत आहे. त्यासाठी 'ईच्हार स्कील डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' कंपनीच्यावतीने राबविला जातो. एका इटालियन कंपनीचे सहकार्य घेऊन 'ईच्हार इक्विपमेंट्स फ्लेक्झोग्राफी प्रिंटिंग मशीन' भारतीय बाजारपेठेत आणत आहे. यामुळे कंपनीचा व्यवसाय दुपटीने वाढणार आहे. तत्त्वनिष्ठतेवर पांचाळ कुटुंबीयांचा भर आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी अवलंबत असताना अनेक गरजवंतांना वैद्यकीय साहाय्य पुरविणे, उदयोन्मुख क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे म्हणून क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणे आदी उपक्रम कंपनीच्यावतीने राबविले जात आहेत. भारतीय तसेच जगाच्या बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना गरुडभरारी घेण्याची संधी आहे. आपल्याकडे बुद्धिमान युवक आहेत. फक्त त्यांनी मनापासून श्रम करणे, आपल्या आवडीच्या विषयात झोकून देणे व सतत नाविन्याचा शोध घेणे असे गुण अवलंबायला हवेत, तरच भारतीय तरुणांचे भवितव्य उज्ज्वल आहे.

                                                                                                                                               - भटू सावंत

                                                                                                                                               udyogvivek@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.