थोडक्यात माहिती

विवेक समूह मराठी प्रसारमाध्यम क्षेत्रात ‘प्रसारमाध्यमातून परिवर्तन’ हे ब्रीदवाक्य घेवून गेली ७० वर्षे यशस्वीरीत्या काम करत आहे. ‘विवेक समूहा’तर्फे मराठी ‘साप्ताहिक विवेक’ तसेच मासिक म्हणून ‘हिंदी विवेक’ आणि ‘शिक्षणविवेक’ यांचेही प्रकाशन होते. समूहाने नेहमीच राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. तसेच ‘आधुनिक महाराष्ट्राची जडण घडण - शिल्पकार चरित्रकोश’ यासारखा महत्वकांक्षी प्रकल्पसुद्धा समर्थपणे चालविला आहे.
सध्याच्या काळात उद्योग व्यवसायाची गरज, व्याप्ती आणि महत्त्व लक्षात घेता, ‘विवेक समूह’ ‘उद्योग विवेक’ नावाचे उद्योग विषयक वेबपोर्टल सुरु करत आहे.
पूर्वी उद्योग व्यवसायापेक्षा नोकरीला आणि त्यातही सरकारी नोकरीला प्राधान्य दिले जात होते. पण सध्या सरकारी नोकरीमध्ये पुरेशा जागा उपलब्ध नाहीत. ज्या आहेत, त्या वेळेवर भरल्या जात नाही. तर पारंपारिक व्यवसाय मागे पडत चालले आहेत. त्यामुळे तरुणपिढी नव्या उद्योग व्यवसायाकडे वळताना दिसत आहे. उद्योग व्यवसायाकडे नेहमी पाठ फिरवणारा मराठी माणूसही यात आता मागे नाही. ही एक चांगली बाब आहे. हाच विचार घेऊन ‘विवेक समूह’ तरुणांसाठी, नव्या उद्योजकांसाठी ‘उद्योग विवेक’ नावाचे वेबपोर्टल सुरु करत आहे. ह्या वेबपोर्टलच्या माध्यमातून होतकरू उद्योजकांना मार्गदर्शन करणे, वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायांची माहिती पुरवणे, प्रसिद्ध उद्योजकांच्या मुलाखतीतून त्यांना प्रेरणा देणे, नेहमीपेक्षा जरा वेगळा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे, व्यवसायासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींची सांगड घालण्यासाठी गुंतवणूक, मालमत्ता, मार्केटिंग, शेअरबाजार, बँक-उद्योग कर्ज याविषयीची माहिती संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडून मिळवणे. तसेच महिला उद्योजकांना, लघु उद्योजकांना अद्ययावत माहिती देवून चालना देणे हा आमचा हेतू आहे.