उद्योगस्वामिनी

काही वर्षांपूर्वी मधुसूदन सत्पाळकर नावाच्या झपाटलेल्या तरुणाने स्वप्न पाहिलं होतं उद्योजक होण्याचं. या स्वप्नाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरूही झाली होती. त्याच्या 'मैत्रेय ग्रूप ऑफ कंपनीज'च्या माध्यमातून एकाच वेळी वेगवेगळे प्रकल्प सुरू होत होते. त्याच्या या प्रवासात त्याला पडद्यामागून साथ होती त्याच्या पत्नीची, वर्षा सत्पाळकर यांची. स्वप्नपूर्तीच्या या वाटेवरच काळाने अचानक त्याला गाठलं. एकीकडे पतीला गमावण्याचं दुःख, तर दुसरीकडे अगदी प्राथमिक स्तरावर असणारा व्यवसाय. अशा वेळी वर्षा यांनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून 'मैत्रेय'ची सूत्रं हाती घेतली. कंपनीसाठी त्यांचे अहर्निश कष्ट, वेळोवेळी घेतलेले योग्य निर्णय, नवनवी आव्हानं, त्याची केलेली सुनियोजित पूर्तता या सगळयांचं फळ आज दिसत आहे. वर्षा यांच्या एका निर्णयाने मधुसूदन सत्पाळकर यांनी रुजवलेल्या या अंकुराचा आज महावृक्ष झाला आहे. WCRC- अर्थात वर्ल्ड कन्सल्टिंग रिसर्च कॉर्पोरेशनच्या 'आयब्रँड 360' या संशोधन विभागाने आशियातील पहिल्या पंचवीस व्यावसायिकांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. पतीचा उद्योजकतेचा वारसा पुढे चालवणाऱ्या वर्षा सत्पाळकर या यशस्वी उद्योजिकेच्या प्रेरणादायी प्रवासाचा हा लेखाजोखा.....

     कोकणातल्या कुडाळमध्ये राहणारी वर्षा परुळेकर नावाची एक तरुणी. अगदी तुमच्या-आमच्यासारखी. मधुसूदन सत्पाळकर यांच्याशी विवाह होऊन मुंबईत आली. मधुसूदन सत्पाळकर ही उद्योजक होण्याच्या ध्येयाने झपाटलेली व्यक्ती. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे हे त्यांचं स्वप्न. 1998 साली त्यांनी 'मैत्रेय ग्रूप ऑफ कंपनीज' नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. त्याअंतर्गत बांधकाम, हॉटेल, मेगानेट, मास कम्युनिकेशन अशा वेगवेगळया सात कंपन्या सुरू झाल्या होत्या. 12 ऑक्टोबर 2003 रोजी मधुसूदन सत्पाळकर यांचं आकस्मिक निधन झालं आणि आता मैत्रेयचं पुढे काय, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

     पतीचं निधन हा वर्षा यांच्यासाठी मोठा धक्का होता. त्यांची मुलगी ध्रुविका तेव्हा केवळ पाच वर्षांची होती. मुलीला घरच्यांच्या ताब्यात देऊन मधुसूदन यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी त्या मैत्रेयच्या कार्यालयात हजर झाल्या आणि त्यांनी कंपनीची सूत्रं हाती घेतली. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. तोपर्यंतची पार्श्वभूमी सांगताना त्या म्हणाल्या, ''मी मूळची मुंबईची, बालमोहन शाळेतली. काही वर्षांनी आईच्या तब्येतीच्या तक्रारीमुळे आम्हाला कुडाळला स्थलांतरित व्हावं लागलं. माझं कॉलेजचं शिक्षणही तिथेच झालं. सातवी-आठवीत होते तेव्हापासूनच आईला आजारी पाहत आले आहे. घरातली मोठी मुलगी असल्यामुळे आईच्या आजारपणाचं दुःख बाजूला ठेवून घरातलं सगळं काम मला सांभाळावं लागलं. शिक्षणही घर सांभाळूनच करावं लागलं.

     मी बी.कॉम. केलं आणि नोकरीला लागले. तिथेच मधुसूदनने माझ्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्वसंमतीने आम्ही विवाहबध्द झालो. मी व्यवसायाभिमुख असं शिक्षण घेतलं नसलं तरी वडिलांचा कापडाचा व्यवसाय होता. त्यामुळे व्यवहार कसे करायचे, व्यवसायातले ताणतणाव कसे असतात हे सुरुवातीपासूनच पाहत होते. या एकंदर पार्श्वभूमीमुळे सुरुवातीपासूनच पुढाकार घेऊन सगळं करायची आणि जबाबदाऱ्या सांभाळायची मला सवय होतीच. मात्र ज्या परिस्थितीत मी मैत्रेयची सूत्रं हाती घेतली, तेव्हाची परिस्थिती फारच वेगळी होती. कामाचा एक मोठा पट माझ्यासमोर होता. मैत्रेयचा व्याप पसरत चालला होता. या सगळया व्यापाचा सूत्रधार आम्हाला सोडून गेलेला होता. शून्यापासूनच एखाद्याला सुरुवात करायची असते, तेव्हा कोणतंही पाऊल उचलताना विचार करायला वेळ मिळतो. मात्र मी इथे आले, तेव्हा सगळे व्यवसाय बाल्यावस्थेत होते. त्यामुळे मागे फिरायला वाव नव्हता.''

सहवासाने शिकवलं....

     मधुसूदन सत्पाळकर यांच्या निधनामुळे मैत्रेयचा कणाच नाहीसा झाला होता. अशा वेळी जगण्याची जिद्द हरवलेल्या वर्षा यांना प्रत्येक जण मैत्रेयचा कारभार हाती घेण्याचं आवाहन करत होता. ''माझ्या मनाचा पुरता गोंधळ उडालेला होता. मधुसूदनवर ज्यांनी अतोनात प्रेम केलं, त्यांच्यापैकी प्रत्येक जण 'मी आता मैत्रेयचा संसार सांभाळावा' असा आग्रह करत होता. एकीकडे वैयक्तिक दुःख, तर दुसरीकडे इतरांचा आग्रह. मधुसूदन त्याच्या कल्पना मला सांगत असे. पण तेव्हा मी मुलीचं संगोपन आणि घर यात गुंतलेली होते. एखादी लढाई परिघाबाहेर उभं राहून पाहणं आणि लढाईत प्रत्यक्ष उतरणं इतकंच अंतर मी मैत्रेयसाठी बाहेरून काही करणं आणि प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारणं यात होतं. पण या परिस्थितीत मी काय केलेलं मधुसूदनला आवडलं असतं असा विचार मी केला आणि त्याची स्वप्नपूर्ती हेच स्वतःचं ध्येय ठरवून घेतलं. मैत्रेयवर अवलंबून असलेल्या असंख्य लोकांचे संसार सावरण्यासाठी मला पुढे येणं भागच होतं.'' मधुसूदन सत्पाळकर यांच्या निधनानंतर मैत्रेयचा कारभार हाती घेताना वर्षा यांना व्यवसायाचा अनुभव नव्हता, तरी त्यांच्या सहवासातली साडेसात वर्षं खूप काही शिकवून गेली. त्यांची धडाडी, जिद्द,निर्णयक्षमता, कष्ट करण्याची तयारी, आव्हानं पेलण्याची तयारी, स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी त्यांची चाललेली धडपड हे सगळं पाहिलेलं असल्यामुळे त्यांची स्वप्नपूर्ती हेच आपलं अंतिम ध्येय त्यांनी मनाशी पक्क केलं.

     वर्षा यांनी मैत्रेयचं काम बघायला सुरुवात केली, तेव्हा सात कंपन्या सुरू होत्या. त्याविषयी त्या सांगतात, ''आज जळगावला हॉटेल मैत्रेयाज हे आमचं थ्री-स्टार हॉटेल आहे. त्या वेळी त्याचा केवळ पाया तयार होता. विरारला काही ठिकाणी इमारतींचं अर्धवट काम तयार होतं. काही ठिकाणी जमिनी विकत घेतल्या होत्या आणि त्याचे प्लान्स परवानगीसाठी गेलेले होते. 'मामाचा गाव' ही मधुसूदनची मूळची सेकंड होमची संकल्पना. त्याची एक-दोन कॉटेजेस बांधून तयार होती. मैत्रेय मेगानेट या मिनरल वॉटरच्या प्रकल्पाची मशीनरी मागवलेली होती. धुळयाला भाडयाच्या जागेत असणारी डेअरी स्वतःच्या मालकीच्या जागेत हलवायची होती. मैत्रेयचे उद्योग अशा या बाल्यावस्थेत असताना मी रंगमंचावर प्रवेश केला होता. पण मधुसूदन यांच्या सहवासातून झिरपलेली त्यांची कौशल्यच मला या सगळयात मदत करत होती.

मदतीतून घडत गेले

     निर्णयक्षमता या मधुसूदनच्या कौशल्याचा मला खूप उपयोग झाला. प्रत्येक वेळी ताबडतोब लाभाचा विचार करून चालत नाही, तर दूरगामी लाभाचा विचार करून मगच निर्णय घ्यावे लागतात. काही वेळा व्यावसायिक लाभांपेक्षा अन्य लाभांचा विचार करावा लागतो, असं त्याचं मत होतं. एखाद्याचे गुण, कौशल्यच आपल्याला मदत करतात हे खरं; पण काळानुसार त्यात बदलही करावे लागतात. मधुसूदन कोणावरही सहज विश्वास ठेवायचे. कोणी मदत मागायला आलं तर फार चौकशी न करता मदत करायचे. व्यवसायात एखादा करार करताना समोरच्यावर पटकन विश्वास ठेवायचे. या बाबतीत माझी मतं पूर्णपणे वेगळी होती. तसेच मला काही कटू अनुभवही अाले. त्यामुळे ताकही फुंकून प्यायची सवय मला सुरुवातीपासूनच लागली. जोपर्यंत एखाद्या व्यवहाराबाबत मला विश्वास वाटत नाही, तोपर्यंत मी तो करत नाही. आपल्याला जर मोठी उद्योजिका व्हायचं असेल, तर जगावर आंधळा विश्वास असून चालत नाही, असं मला वाटतं.

     मैत्रेयची सूत्र हाती घेण्यापूर्वी मी पूर्णवेळ गृहिणी होते. त्यामुळे हा प्रवास सोपा असणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती. 'वर्षाला हे काय जमणार', अशा भावनेने मधुसूदनच्या काही मित्रमैत्रिणींनी मैत्रेयकडे पाठ फिरवली, अनेकांनी माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन मला फसवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या प्रवासाच्या खडतरपणाची मला अधिक जाणीव झाली. परंतु माझा निर्धार पक्का होता. विजय तावरे, लक्ष्मीकांत नार्वेकर, नितीन चौधरी, निलेश गोडांबे, माझा भाऊ प्रसाद, भरत मेहेर यांच्यासारखे मैत्रेयच्या स्थापनेपासून बरोबर असलेले सहकारी यांच्या मदतीतूनच मी शिकत गेले. घडत गेले.

    मैत्रेय हॉटेल्स ऍंड रिसॉर्ट्सच्या माध्यमातून खानदेशातील पहिलं थ्री स्टार हॉटेल जळगावात उभं राहिलं. वास्तविक या ठिकाणी क्लब सुरू करण्याचा मधुसूदनचा विचार होता. परंतु ती जागा एमआयडीसी परिसरात होती. मार्केट सर्वेक्षण केल्यानंतर तिथे क्लब कितपत चालेल अशी शंका माझ्या मनात आली. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तिथे हॉटेल सुरू करण्याचा निर्णय मी घेतला. मैत्रेय हॉटेल्स ऍंड रिसॉर्ट्स या कंपनीचेच लोकांच्या पसंतीस उतरलेले, धुळे येथील मैत्रेय कल्चरल ऍंड ट्रेनिंग पॉईंटच्या आवारातील 'लज्जत रेस्टॉरंट', मुंबईजवळील बोईसर येथील 'मामाचा गाव रिसॉर्ट' हे काही उल्लेखनीय प्रकल्प.

     मैत्रेय रिऍल्टर्स ऍंड कन्स्ट्रक्शनचा विस्तार विरार, वसई, सांगली, धुळे, नाशिक, मुंबई, बडोदा, कच्छपर्यंत झाला आहे. वर्ल्ड कन्सल्टिंग रिसर्च कॉर्पोरेशनने आशियातील पहिल्या 25 प्रॉपर्टीजमध्ये नाशिक मैत्रेय ग्रीन्सची निवड केली आहे. IGBCने मैत्रेय ग्रीन्सला प्री गोल्ड सर्टिफिकेशन दिले असून हा संपूर्ण नाशिकमधला प्रमाणपत्र मिळालेला पहिला टाऊनशिप प्रकल्प आहे.'' उद्योगक्षेत्रात प्रत्येक क्षणच आव्हानात्मक असतो, असं त्या सांगतात. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मधुसूदन सत्पाळकर यांनी सात कंपन्या पाठोपाठ सुरू केल्या होत्या. त्यामुळे वर्षा यांना वेगवेगळया स्तरांवर वेगवेगळी आव्हानं पेलावी लागली, त्यांच्याच मैत्रेय मास कम्युनिकेशनचा वेगळया वाटेवरचा प्रवास जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

वेगळया वाटा

     ''मधुसूदन हा स्वतः साहित्यिक होता, कवी होता. त्याच्या हयातीतच काही पुस्तकांचं प्रकाशन आम्ही केलं होतं. मी कार्यभार स्वीकारला तेव्हा आमची, पर्यटन व्यवसायाशी संबंधित 'भटकंती' आणि स्त्रीविषयक 'मैत्रीण' ही दोन नियतकालिकं चालू होती. ही दोन्ही कामं आम्ही बाहेरून करून घेत होतो. पण त्यापेक्षा ही कामं इनहाऊस केली तर अधिक फायदा होईल, असं आम्हाला वाटलं. त्यामुळे ती कामं आम्ही स्वतःच करायला सुरुवात केली. मैत्रेयच्या दशकपूर्तीनिमित्त 2008 साली 'मैत्रेय प्रकाशन' हा मैत्रेय मास कम्युनिकेशनचा एक विभाग सुरू झाला. मैत्रेय प्रकाशनने केवळ पाच वर्षांत पुस्तकांची शंभरी ओलांडली. आज मराठीतले अनेक महत्त्वाचे लेखक, अनुवादक मैत्रेयच्या कुटुंबाचा भाग बनले आहेत. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ज्येष्ठ कवी-पटकथाकार जावेद अख्तर यांच्यापर्यंत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंपर्यंत, कादंबरीकार राजन खान यांच्यापासून डॉ. राजेंद्र बर्वेंपर्यंत मैत्रेय प्रकाशन ही सगळयांचीच पहिली पसंती आहे. 1998पासून आम्ही काही ऑडिओ आणि व्हिडिओ सीडीजची, तसंच लघुपटांची आणि माहितीपटांची निर्मिती करायला सुरुवात केली होतीच. त्याहीपुढे जाऊन चित्रपट निर्मिती क्षेत्रात का उतरू नये, या विचारातून मैत्रेय मास मीडियाच्या माध्यमातून गेल्या वर्षी आम्ही 'टपाल' या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट देश-विदेशातल्या नऊ चित्रपट महोत्सवात गाजला. इतकंच नव्हे, तर बॉक्स ऑफिसवर तो तब्बल सहा आठवडे चालला.''

     आज मैत्रेय हॉटेल्स ऍंड रिसॉर्ट्स, मैत्रेय मेगानेट, मैत्रेय रिऍल्टर्स ऍंड कन्स्ट्रक्शन, मैत्रेय प्लॉटर्स ऍंड स्ट्रक्चर्स, मैत्रेय मास कम्युनिकेशन सर्व्हिसेस, मैत्रेय रूरल ग्रोथ व्हेंचर, मैत्रेय मास मीडिया अशा वेगवेगळया क्षेत्रांत त्यांनी स्वतःला सिध्द केलं आहे. याचं श्रेय निश्चितच वर्षा सत्पाळकर यांच्या कष्टांना जातं. त्यांच्यामुळे आज अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. कोणत्याही स्त्रीला घराबाहेर राहून जेव्हा पूर्णवेळ व्यवसाय किंवा नोकरी करावी लागते, तेव्हा प्रश्न येतो तो घर सांभाळण्याचा आणि मुलांच्या संगोपनाचा. वर्षा यांना पाच वर्षांच्या ध्रुविकाच्या संगोपनाची जबाबदारी घरच्यांवर सोडावी लागली. ''त्यांची साथ नसती, तर आज मैत्रेयचा व्याप सांभाळणं मला अशक्य झालं असतं. आम्ही वेगवेगळे राहत असलो तरी मनाने आजही एकत्र आहोत'' असं त्या सांगतात.

आंतरराष्ट्रीय दखल

     वेगवेगळया क्षेत्रांत यशस्वी होऊन उद्योगजगताला स्वतःची नोंद घ्यायला लावणाऱ्या उद्योजिका वर्षा सत्पाळकर यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. WCRCच्या - अर्थात वर्ल्ड कन्सल्टिंग रिसर्च कॉर्पोरेशनच्या 'आयब्रँड 360' या संशोधन विभागाने आशियातील पहिल्या पंचवीस व्यावसायिकांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. याशिवाय डी.एस.के. सेल्फ मेड मॅन पुरस्कार, सह्याद्री वाहिनीचा हिरकणी पुरस्कार, इंडियन असोसिएशन फॉर कॉमर्स ऍंड इंडस्ट्रीजचा उद्योग विभूषण सन्मान, प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार, चाणक्य सर्वश्रेष्ठ उद्योजक, वन इंडिया पुरस्कार, हे आणखी काही मुख्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विशेष म्हणजे डी.एस.के. सेल्फ मेड मॅन पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या स्त्री उद्योजिका आहेत.

      स्त्री म्हणून जशा अडचणी असतात, तसंच काम करताना स्त्रीविषयक अनेक गुणांचा आपल्याला उपयोग होत असल्याचं त्यांना वाटतं. बाई ही मल्टिटास्किंग करू शकते - म्हणजेच एकाच वेळी अनेक अवधानं सांभाळू शकते. याच गुणाचा उपयोग त्यांना एकाच वेळी वेगवेगळया क्षेत्रांतील व्यवहार करताना झाला. स्त्री ही मुळातच प्रामाणिक असते आणि ठरलेली कामं वेळच्या वेळी, व्यवस्थित पूर्ण करणं तिला आवडतं. तिच्याकडे जात्याच सौंदर्यदृष्टी असते. या सगळयाचा फायदा आपल्याला झाला आणि त्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो, असं त्या सांगतात.

उद्योग आणि बरंच काही....

      'मैत्रेय रूरल ग्रोथ व्हेंचर' हे वर्षा यांचं आणखी एक अपत्य. सामाजिक उद्योजकांचे हात बळकट व्हावेत या उद्देशाने मैत्रेय रूरल ग्रोथ व्हेंचर सुरू झालं. विदर्भातील यवतमाळजवळील वणी येथे पहिला रूरल बीपीओ, राजस्थानात उदयपूरजवळ झाडोल येथे कथौडी जमातीच्या लोकांना बांबू फर्निचर बनवण्याचं प्रशिक्षण देऊन व्यवसाय वृध्दीसाठी मदत, कोकणात निसर्ग मंचच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न अशा अनेक अंगांनी मैत्रेय रूरल ग्रोथ व्हेंचर ही कंपनी सामाजिक उत्थानाला हातभार लावत आहे.

      मैत्रेय फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील अनेक वंचित घटकांना मदत केली जाते. आरोग्यपीठ, विकासपीठ, ज्ञानपीठ, कलापीठ आदींच्या माध्यमातून विविध शिबिरं, कार्यशाळा भरवल्या जातात. प्रत्येक वेळी केवळ आर्थिक मदतीबरोबरच लोकांपर्यंत पोहोचून त्यांचा विकास करावा लागतो. समाजाकडून घेतलेलं समाजाला परत देणं हे मैत्रेयचं धोरण आहे. केवळ कला महोत्सव, आरोग्य शिबिरं भरवणं इतकंच हे काम सीमित नाही. नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही मैत्रेयने कायमच मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तरांचल येथे उद्भवलेल्या प्रलयानंतर तेथील दोन गावं मैत्रेय फाउंडेशनने दत्तक घेतली आहेत. बोईसरजवळील एक गावही दत्तक घेतलं आहे.

      मैत्रेयच्या पुढच्या वाटचालीबद्दल आणि लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल आम्ही त्यांना विचारलं. त्या म्हणाल्या, ''हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीवर आम्ही अधिक भर देणार आहोत. त्या माध्यमातून काही वेलनेस सेंटर सुरू करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रातल्या पहिल्या दहा उद्योगसमूहांत मैत्रेयचा समावेश व्हावा, अशी माझी इच्छा आहे. बंगलोरमध्ये खासगी इंडस्टि्रअल पार्क उभारण्याकडे मैत्रेयची वाटचाल सुरू आहे. हे संपूर्ण देशातील पहिलं खासगी इंडस्टि्रअल पार्क असेल.

उद्योजिकांची फळी तयार व्हावी

      आज अनेक स्त्रिया मला भेटतात आणि माझ्याकडे बघून त्यांना प्रेरणा मिळत असल्याचं सांगतात, तेव्हा छान वाटतं. खरं तर स्त्रीने पैसा कमावण्यासाठी नोकरीपुरतं स्वतःला सीमित न ठेवता उद्योगाच्या दिशेने वळलं पाहिजे. मी स्त्रीच्या अंगी असणाऱ्या गुणांचा मघाशी उल्लेख केलाच. समाजात माझ्यासारख्या अनेक जणी आहेत, ज्यांनी थोडं बळ एकवटलं, पुढाकार घेतला तर त्या आपापल्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतात. माझ्यासारख्या अनेक वर्षा तयार व्हायला हव्यात, तर उद्योजिकांची नवी फळी तयार होईल. तसं झालं, तर स्त्रियांचं भविष्य उज्ज्वल आहे.''

मृदुला राजवाडे

9920450065

स्रोत : साप्ताहिक विवेक

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.