उद्योगाचे ललितसूत्र

सध्याच्या धावपळीच्या युगात करिअरच्या वाटा शोधण्यात तरुणांची कसरत होत असताना उच्च पदवी संपादन केलेले तरुण सहसा विदेशात नोकरी पत्करून स्थिरस्थावर होताना दिसतात. मात्र, उच्चशिक्षित असतानाही ललित तर्टे या तरुणाने स्वदेशातच राहून, ‘वेडिंग प्लॅनिंग’च्या उद्योग जगतात घेतलेली भरारी ही इतरांसाठी प्रेरणादायक अशी ठरली आहे.

ललित यांचा जन्म डोंबिवलीतील. दि. ९ सप्टेंबर १९९० रोजी जन्म झालेल्या ललित यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण अभिनव विद्यालय आणि मॉडेल महाविद्यालयात झाले. ललित यांचे वडील श्रीनिवास तर्टे हे डोंबिवलीतील सुप्रसिद्ध वकील. गेली ३० वर्षं ते प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंटेशन संदर्भात स्टॅम्प व्हेंडर एजन्सी चालवतात, तर आई कांचन तर्टे या स्टॅम्प वेंडरचे काम करतात. वडील वकिली क्षेत्रात असताना ललितने मात्र आपल्या करिअरची वाट स्वतंत्रपणे निवडली. मॉडेल महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ललित हे सिंगापूरला पदवीचे शिक्षण घेण्यासाठी मार्गस्थ झाले व नंतर लंडनला ‘मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस आणि मार्केटिंग’ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. साधारण एक वर्ष हा अभ्यासक्रमपूर्ण केल्यानंतर ते मायदेशी परतले आणि विनायक हॉलच्या माध्यमातून त्यांनी त्यांची उद्योजकीय वाटचाल सुरू केली. हे करताना त्यांनी ‘डिप्लोमा इन वेडिंग प्लॅनर’ हा कोर्सही मुंबईतून पूर्ण केला. लग्न समारंभात नातेवाईकांची झालेली फसवणूक लक्षात घेता हे क्षेत्र निवडले, असे ते सांगतात. शिक्षण पूर्ण करण्यासाठी जेव्हा ते लंडनला गेले, त्यावेळी त्यांनी नवनवीन व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. त्यात इतरत्र नोकरीच्या संधी स्वीकारण्यापेक्षा व्यवसाय करण्याचीच त्यांची इच्छा होती. वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा होता. मात्र, विनायक मंगल कार्यालयाच्या माध्यमातून ‘वेडिंग प्लॅनर’ म्हणून काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे या क्षेत्रात पूर्णपणे झोकून दिल्याचे ललित सांगतात. पण, सुरुवातीच्या काळात हे कामकरण्यासाठी लागणारे पुरेसे आर्थिक पाठबळ उभारण्यासाठी त्यांच्या वडिलांनी श्रीनिवास तर्टे यांनी त्यांना खूप मोलाची मदत केली. या अडचणीवर मात केल्यानंतर मात्र कोणतीही अडचण तितकीशी मोठी नव्हती, असेही ललित सांगतात.

एकीकडे भ्रमंतीची आवड, तर दुसरीकडे वेडिंग प्लॅनिंगचे शिक्षण घेतल्यानंतर जर्मनी, ग्रीस, माल्टा, ऑस्ट्रिया, टर्की या आंतराष्ट्रीय ठिकाणी वेडिंग प्लॅनर म्हणून काम केले, तर मायदेशातील उदयपूर, गोवा, दिल्ली या ठिकाणी ही वेडिंग प्लॅनरची कामं केली आहेत. आजघडीला ललित यांच्याकडे एक यशस्वी उद्योजक म्हणून पाहिले जाते. विनायक हॉलचा कारभार सांभाळताना साधारण एक वर्ष त्यांना स्थिरस्थावर होण्यात गेला. आईवडिलांचा आर्थिक पाठिंबा आणि यात वडिलांची जिद्द, आईचा खडतरपणा आणि मित्रत्वाचं नातं साथीला होतंच. या दोघांच्या सिद्धांतावर काम केल्याने यशस्वी होऊ शकलो, असे ललित अभिमानाने सांगतात. ‘‘लग्न म्हटलं की, सर्वत्र भावनिक गुंतागुंत असते. तसेच हे आयुष्यभर लक्षात राहावे, इतके ते सुंदर स्वप्न असते. हे स्वप्न जपण्यासाठी माझाही काहीसा हातभार असतो व त्या निमित्ताने मला काही नवीन लोक कळतात. आचार विचार समजण्यासाठीची ही उत्तमसंधी आहे,’’ असेही ललित यांचे मत आहे. कल्याण स्टेशननजीक असलेल्या विनायक मंगल कार्यालयात मुबलक पार्किंगची सोय आहे. या ठिकाणी दोन वातानुकूलित बँक्वेट हॉल आहेत. यातील एका हॉलची क्षमता सुमारे ५०० ते ८०० लोकांची असून याव्यतिरिक्त एक मिनी हॉलही येथे आहे. मिळणारा प्रतिसाद पाहता गेल्या वर्षी मे २०१७ साली ललित यांनी बॉलरूम पलाझोचे काम हाती घेतले. कल्याण-डोंबिवलीकरांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कल्याण मेट्रो मॉलमध्ये हे सभागृह आहे. या ठिकाणीही उत्तम पार्किंगची सोय असून सुमारे २५०० क्षमता असलेले ठाणे जिल्ह्यातले हे एकमेव सभागृह आहे. या दोन्ही सभागृहात उत्तमदर्जाचे जेवण, तसेच वेडिंग प्लॅन केले जाते व या कामात ललित स्वतः लक्ष घालतात. विनायक मंगल कार्यालय हे सर्वसामान्यांना परवडणारे सभागृह. तसेच स्वतः वेडिंग प्लॅनर असल्याने लग्नात उत्तम सजावट करण्याचा ललित यांचा कटाक्ष असतो. सद्यस्थितीला ललित यांचा व्यवसाय उत्तम चालला आहे, पण आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी ललित नफा किती झालंय, यावरच खर्चाचे गणित आखतात. तसेच या फंड्यातून हा व्यवसाय दिल्लीपर्यंत नेण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

या व्यवसायात त्यांनी स्वतःला झोकून दिले असले तरी सकाळी वडिलांच्या कार्यालयात ते हातभार लावतात. यानंतर विनायक हॉल व नंतर बॉलरूम पलाझोचे काम असा त्यांचा दिनक्रम. या धावपळीत उत्तम आरोग्य राखण्यासाठी व्यायामाकडेही त्यांचे विशेष लक्ष असते. एकीकडे कामाचा पसारा वाढत असताना पुस्तकवाचनही नित्य नेमाने चालू असते. जगभ्रमंती करताना अनोख्या वस्तूंचा संग्रह करण्याचाही त्यांना छंद आहे. मंगल कार्यालय चालवताना केवळ आर्थिक उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलेले नाही. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उत्कट भावनेतून हे मंगल कार्यालय सामाजिक उपक्रमासाठी दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने पोलिओ निर्मूलन शिबीर असो अथवा रक्तदान शिबीर असो यासाठी हॉल उपलब्ध करून दिला जातो, तर लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात. यासाठी रोटरी समूहाचे सहकार्य लाभल्याचे ललित सांगतात. गेली सात वर्षे मंगल कार्यालयाची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळत आहेत. आजमितीला १३ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि हे सर्व कर्मचारी तरुण आहेत. विनायक हॉलमध्ये कार्यरत असणार्‍या सर्वच कर्मचारी वर्गाशी ते खूप मनमोकळेपणे वागतात. तसेच कधीही मालकीचा रुबाब दाखवत नाहीत व कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडविण्याचा ते प्रयत्न करतात. कर्मचार्‍यांशी कशाप्रकारे मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे, हे ललित यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांतून दिसून येते. या मनमिळाऊ वातावरणात कर्मचार्‍यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळतेच. पण, त्याचबरोबर संगणकीय क्षेत्राचे शिक्षणही ललित यांच्याकडून दिले जाते.

आयुष्यात जोखीम महत्त्वाची
उद्योगातील आव्हानांबद्दल विचारले असता, ललित म्हणतात की, ‘‘आयुष्यात जोखीमपत्करणे गरजेचे असते. माझ्याकडे उच्च पदवी होती. त्याचबरोबर जगभ्रमंतीचा अनुभव गाठीशी असल्याने विदेशात मला सहजपणे नोकरीची संधी उपलब्ध झाली असती. मात्र, मी मायदेशात येऊन व्यवसाय करण्याचे निश्चित केले होते. वडिलांचा कारभार असो अथवा मंगल कार्यालयाचा कारभार असो, या व्यवसायाला उत्तरोत्तर उभारी कशी येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.’’ हेच त्यांच्या यशाचे ‘ललितसूत्र’ म्हणावे लागेल.
 

- रोशनी खोत

udyogvivek@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.