वाहनचालक ते उद्योजक

उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहिल्यानंतर ते पूर्ण करण्याची इच्छा शरण्यन शर्माकडे होती. त्यांचा ‘वाहनचालक ते उद्योजक’ हा प्रवास खडतर होता. ते सध्या श्रीलंकेतील ‘एक्स्ट्रिमसिओ डॉट नेट’ या नावाजलेल्या डिजिटल मार्केटिंग फर्मचे सीईओ आहेत. त्यांच्या अन्य दोन कंपन्या आहेत. ‘पव्हीलेज सर्व्हर टेक्नोलॉजिस’ आणि ‘७ अरेना टेक्नोलॉजिस.’

शरण्यन यांचे कुटुंब २००९ साली जाफनामधून उत्तर श्रीलंकेतील वावुनिया या शहरात स्थलांतरित झाले. त्याचे कारण होते, तामिळ-सिंहली नागरी युद्ध. त्याबद्दल शरण्यन यांनी सांगितले की, “मी इथे आलो, त्यानंतर जवळजवळ तीन महिन्यानंतर माझ्या कुटुंबीयांना भेटलो. तोपर्यंत मला त्यांची काहीच माहिती मिळत नव्हती. ते जिवंत आहेत की नाही तेही समजत नव्हते. त्या नागरी युद्धाचे इतके भयंकर परिणाम होते की, त्यामुळे कुटुंबांविषयी काहीच कळत नव्हते.’’ त्यावेळी शरण्यन कोलंबोमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. मात्र, नंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी कुटुंबाकडून मिळणारी आर्थिक मदत बंद झाल्याने त्यांनी वाहनचालकाची नोकरी धरली. पण, तिथेही त्यांना गाडी वेगात चालविण्याच्या तक्रारीवरून काढून टाकण्यात आले. मग मात्र, या घटनेनंतर त्यांच्या मनात उद्योजक बनण्याचे स्वप्न आकार घेऊ लागले. त्यांना वाहनचालक म्हणून जगायचं नव्हतं, तर स्वतःच काहीतरी करायचं होते.

शरण्यन सांगतात की, “त्या दिवसात ई-कॉमर्स खूप प्रचलित होते आणि ते एक क्षेत्र आहे जिथे सर्वांना समान संधी मिळते. म्हणून त्यातच मला जास्त संशोधन करावेसे वाटले. मात्र, त्यांच्याकडे २२ हजार श्रीलंकन रुपये (एलकेआर) होते, पण अगदी साध्या संगणकासाठी सुद्धा ४८ हजार एलकेआर मोजावे लागायचे. त्यामुळे मला पैसे उधार घ्यावे लागले. पण तेही कोणी देत नव्हते. कारण, मला कोणी ओळखतच नव्हते. शेवटी भावाच्या शिफारशीवरून शेजार्‍यांनी त्यांना पैसे दिले. शरण्यन ब्राह्मण कुटुंबातून आल्याने त्यांनी धार्मिक कर्तव्ये पार पाडावीत, असा त्यांच्या कुटुंबीयांचा आग्रह असायचा. त्यामुळे त्यांनी चालू केलेल्या नव्या प्रकल्पाला देखील त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे जेव्हा काम सुरू झाले आणि पहिले दोन महिने कमिशनही न मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या घरच्यांसमोर जाणेही कठीण झाले होते. शेवटी एका अमेरिकन कंपनीने त्यांना काम दिले. मात्र, शरण्यनशी जास्त ओळख नाही त्यामुळे कमी पैसे देणार, असे त्या कंपनीने स्पष्ट केले होते. मात्र, शरण्यन यांना पैशांपेक्षा कुठून तरी सुरुवात करायची होती. शेवटी त्यांच्या प्रकल्पाची मागणी वाढली व मेहनतीची फळे गोड मिळाली.

सध्या शरण्यन यांच्याकडे ६५ कर्मचारी आहेत. ज्यातील सहा अपंग आहेत. श्रीलंकेतील सर्वोत्तम समजले जाणारे सतरा संगणक त्यांच्याकडे आहेत. भारत, चीन आणि फिलिपाईन्समधून काही सल्लागार मंडळींनासुद्धा या कंपनीतर्फे पाचारण करण्यात येते. सध्या मुंबईमध्ये शाखा उघडण्याचे शरण्यन यांचे प्रयत्न सुरू आहेत. शरण्यन यांच्या कंपनीने गेल्या सहा वर्षांत ३८ हजार सोशल मिडिया कॅम्पेन केले. गेल्या काही वर्षांत शरण्यन आणि त्यांच्या कंपनीला अनेक प्रमाणपत्रे, (एसइओ, गुगल एनॅलिटिक्स इ.) अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. २०१२, २०१३ मध्ये त्यांना ‘सर्वोत्कृष्ट उगवता उद्योजक’ म्हणून प्रांतीय आणि राष्ट्रीय पातळीवर नामांकन मिळालं होतं. २०१३ मध्ये त्यांना एशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये आर्थिक उलाढालीसाठी आणि संघर्ष सुरू असलेल्या भागातील हातांना काम दिल्याबद्दल ‘उद्योजकता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शिवाय त्यांना ‘सर्वात तरुण उद्योजक’ म्हणून सुद्धा गौरविण्यात आले.

सध्या ते उत्तर श्रीलंकेत छोट्या छोट्या स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवत आहेत. “पैसे गुंतवत असताना माझा भर असतो, तो ती कल्पना किती नाविन्यपूर्ण आहे यावर आणि किती फायदेशीर आहे यावर,’’ असे शरण्यन यांनी सांगितले. त्यांचा ‘वाहनचालक ते उद्योजक प्रवास’ हा केवळ त्यांची मेहनत आणि इच्छाशक्तीवर इतका पुढे आला. तो असाच पुढे वाढत राहो!

 - पूजा सराफ

udyogvivek@gmail.com 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.